‘बिनविरोध’ निवडीवरून राज्यात राजकीय रणकंदन; मुख्यमंत्री फडणवीस यांचे ठाकरेंना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 05:43 IST2026-01-05T05:41:56+5:302026-01-05T05:43:48+5:30
महापालिकांची रणधुमाळी : महायुतीतील घटक पक्ष विरोधकांच्या टार्गेटवर, ‘त्या’ निवडणुका रद्द करून पुन्हा घ्या, ‘जेन-झी’चा मताधिकार नाकारला

‘बिनविरोध’ निवडीवरून राज्यात राजकीय रणकंदन; मुख्यमंत्री फडणवीस यांचे ठाकरेंना प्रत्युत्तर
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यात होत असलेल्या २९ महापालिकांच्या निवडणुकांमध्ये जवळपास ६८ उमेदवार बिनविरोध आल्याच्या मुद्द्यावरून आता राजकीय रणकंदन सुरू झाले आहे. ज्या प्रभागांमध्ये उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, अशा ठिकाणच्या निवडणुका रद्द करून त्या प्रभागांमध्ये नव्याने निवडणूक प्रक्रिया राबवावी, अशी मागणी उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पश्चिम बंगालमधील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याच्या मुद्द्यावर भाजपने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याकडे लक्ष वेधले. शिवाय, मनसे बिनविरोध निवडीच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिनविरोधच्या मुद्द्यावर विरोधकांना लक्ष्य केले. विरोधक न्यायालयात गेले तरी न्यायालयातही जनतेचाच कौल मान्य होईल, असा टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला.
उद्धवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचा संयुक्त ‘शिवशक्तीचा वचननामा’ प्रसिद्ध केल्यानंतर रविवारी मुंबईत शिवसेना भवन येथे आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी बिनविरोध निवडीच्या मुद्द्यावरून भाजप आणि महायुतीवर निशाणा साधला. राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर शिवसेना भवनाची पायरी चढले.
‘पराभव स्पष्ट दिसतोय म्हणून ते कारणे शोधतायत’
बिनविरोध निवडीच्या मुद्द्यावर मनसे न्यायालयात जाणार असल्याच्या भूमिकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी चंद्रपुरातील रोड शो दरम्यान जोरदार प्रत्युत्तर दिले. “मनसेने खुशाल न्यायालयात जावे. आम्हाला जनतेच्या न्यायालयाने निवडून दिले आहे. जनतेच्या न्यायालयाचा फैसला कायम राहील,” असे फडणवीस म्हणाले.
बिनविरोध निवडून आलेल्यांमध्ये भाजपसोबतच अपक्ष आणि इतर पक्षांचे उमेदवारही आहेत. मात्र, त्यावर बोलले जात नाही. पराभव स्पष्ट दिसत असल्याने कारणे शोधली जात आहेत, असा टोलाही त्यांनी मुंबईतील सभेत लगावला. फडणवीस म्हणाले, “त्यांना न्यायालयात जायचे असेल तर ते नक्की जाऊ शकतात. मात्र जनतेच्या न्यायालयाने आम्हाला निवडून दिले आहे. त्यामुळे न्यायालयातही जनतेचाच कौल कायम राहील.”
अनेक अपक्ष तसेच मुस्लिम उमेदवारही बिनविरोध निवडून आले आहेत, याकडे लक्ष वेधत ते म्हणाले,“त्यांच्याबाबत विरोधक का बोलत नाहीत? कारण त्यांना आपला पराभव स्पष्ट दिसत आहे आणि त्यामुळे ते आता कारणे शोधत आहेत.”
‘लोकशाही नसून झुंडशाही’
सध्याची सत्ता लोकशाही नसून झुंडशाही आहे. दमदाटी करून बिनविरोध निवडणुका लादल्या जात असून, निकाल राखून ठेवले जात आहेत. मतदारांना मतदानापासून वंचित ठेवले गेले. विशेषतः जेन-झी मतदारांचा हक्क हिरावला गेला आहे. जेथे बिनविरोध निवडणुका झाल्या, तेथे प्रक्रिया रद्द करून पुन्हा निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेला नाही : राज ठाकरे
पश्चिम बंगालमधील स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांच्या विरोधात भाजप सर्वोच्च न्यायालयात गेला होता. प. बंगालमध्ये तुम्हाला चालत नाही आणि महाराष्ट्रात तुम्ही ते करता? असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेला नाही. उद्या सत्ता परिवर्तन होईल आणि दुसरे येतील आणि याहून वाईट होईल, तेव्हा तक्रार करू नका, असे राज यांनी सुनावले.
सत्ताधारी आघाडीने धमकी आणि पैशाच्या जोरावर उमेदवारांना माघार घ्यायला भाग पाडल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बिनविरोध निवडीविरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तर निवडणुकीआधी महायुतीचे उमेदवार बिनविरोध होतात कसे? असा सवाल काँग्रेस नेते नाना पटोले यांनी शिर्डी येथे पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला.