कितीही डोमकावळे येवो, शिवडी तुमचीच; बाळा नांदगावकर यांनी दिला ठाकरेंना विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 09:08 IST2026-01-07T09:07:00+5:302026-01-07T09:08:19+5:30
शिवडीमध्ये कितीही डोमकावळे आले. कितीही कोकिळा कुहुकुहु करू लागल्या, तरीही शिवडी तुमचीच आहे, असा विश्वास मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला.

कितीही डोमकावळे येवो, शिवडी तुमचीच; बाळा नांदगावकर यांनी दिला ठाकरेंना विश्वास
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: शिवडीमध्ये कितीही डोमकावळे आले. कितीही कोकिळा कुहुकुहु करू लागल्या, तरीही शिवडी तुमचीच आहे, असा विश्वास मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवडी, लालबाग, परळ, काळाचौकी येथील उद्धवसेना व मनसे उमेदवारांच्या निवडणूक कार्यालयांच्या उद्घाटनप्रसंगी दिला.
सोमवारी रात्री उद्धव ठाकरे, खा. अरविंद सावंत, नेते नांदगावकर, आ. अजय चौधरी, आ. मिलिंद नार्वेकर यांनी लालबाग येथे निर्धार मेळाव्याला उपस्थिती लावली. घशाचा त्रास होत असल्याने ठाकरे यांनी भाषण करणे टाळले, तर शिवडीतील माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांनी उमेदवारी न मिळाल्याने शिंदेसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळविली.
नांदगावकर यांनी यावरून बाळासाहेब ठाकरे हे आपले हृदय आहे. उद्धव ठाकरे व राज ठाकरे, हे त्यांचे दोन डोळे आहेत. समोर बसलेले कार्यकर्ते त्यांचा तिसरा नेत्र असून, कितीही डोमकावळे आले, कितीही कोकिळा कुहुकुहु करू लागल्या तरीही ते जाळून राख केल्याशिवाय राहणार नाहीत, असा टोला लगावला.