सभेसाठी मैदान दिले जात नाही: संजय राऊतांचा दावा; ठाकरे बंधूंची शिवतीर्थावर एकच मोठी सभा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 05:40 IST2026-01-07T05:39:24+5:302026-01-07T05:40:18+5:30
ठाकरे बंधूंच्या मुंबईत तीन सभा होणार होत्या. मात्र, उद्धव व राज दोघांमध्ये मुंबईत शिवतीर्थावर एकच मोठी सभा घेण्यावर एकमत झाले.

सभेसाठी मैदान दिले जात नाही: संजय राऊतांचा दावा; ठाकरे बंधूंची शिवतीर्थावर एकच मोठी सभा
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईत ठाकरेबंधूंची एकच संयुक्त सभा दादरच्या शिवाजी पार्क मैदानात होणार आहे. जास्त सभा घेण्याऐवजी उद्धवसेना व मनसेच्या शाखा-शाखांना भेटी देऊन जनसंपर्कावर भर द्यावा यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे एकमत झाल्याचे खा. संजय राऊत यांनी सांगितले. मुंबईत सभा घेण्यासाठी मैदान उपलब्ध करून दिले जात नाही. मनसे आणि उद्धवसेनेला सभा घेता येऊ नयेत, या हेतूने अडथळे आणले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
ठाकरे बंधूंच्या मुंबईत तीन सभा होणार होत्या. मात्र, वचननामा प्रकाशित करण्याच्या निमित्ताने उद्धव व राज ठाकरे सेनाभवनात आले होते. यावेळी दोघांमध्ये मुंबईत शिवतीर्थावर एकच मोठी सभा घेण्यावर एकमत झाले. सभा कधी आणि कुठे घ्याव्यात, याचे नियोजन केले आहे. नाशिक येथे ९ तारखेला पहिली सभा होणार आहे. संभाजीनगरला उद्धव ठाकरे जाणार आहेत, असे राऊत म्हणाले. राज व उद्धव ठाकरे यांचा रणनीतीनुसार प्रचार सुरू असून, योग्य वेळी ते मैदानात उतरतील, असेही राऊत यांनी सांगितले.
शिवाजी पार्कवर या... राज यांचे निमंत्रण
मंगळवारी कांदिवली, मालाड, गोरेगाव येथील उद्धवसेना व मनसे शाखांना भेटी देताना राज ठाकरे यांनी, रविवारी ११ तारखेला शिवतीर्थावर, शिवाजी पार्कवर माझी व उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. त्याचे निमंत्रण देण्यासाठी आलो आहे. सर्वानी जरुर या असे आवाहन त्यांनी केले.