देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली 'मुंबईकर'ची व्याख्या; "बाहेरून आला म्हणून काय झाले..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 14:43 IST2026-01-08T14:42:02+5:302026-01-08T14:43:13+5:30
Devendra Fadanvis on BMC Election 2026: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या ट्रॅफिक आणि शिस्तीवर मोठे भाष्य केले. मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्याचा संकल्प आणि आगामी प्रकल्पांची दिली माहिती.

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली 'मुंबईकर'ची व्याख्या; "बाहेरून आला म्हणून काय झाले..."
मुंबई: "मुंबईचा महापौर कोण असावा, यात काहीच शंका नाही. तो मराठीच असेल आणि हिंदूच असेल!" अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीचे धोरण स्पष्ट केले.
फडणवीस यांनी हिंदुत्व, मराठी अस्मिता आणि बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्द्यावरून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. आजतकच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
बीएमसीच्या महापौराबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, "चेन्नईत जसा तमिळ महापौर होतो, तसा मुंबईत मराठी महापौरच होणार. ज्यांच्या अंगात छत्रपती शिवरायांचे रक्त आहे आणि जे त्यांच्या विचारांवर चालतात, ते सर्व मराठी आहेत. तसेच बाहेरून आले म्हणून काय झाले, जे इथे स्थायिक झाले आहेत ते सर्व मुंबईकर आहेत, मग त्यांची भाषा हिंदी असो. आपण सर्व हिंदू म्हणून एक आहोत आणि हिंदुत्व हाच आमचा आत्मा आहे."
बांगलादेशी घुसखोरांना हुसकावून लावणार
अवैध घुसखोरांच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री कमालीचे आक्रमक दिसले. "आम्ही केवळ बोलत नाही, तर कृती करतो. बांगलादेशी घुसखोरांना डिपोर्ट (देशातून बाहेर काढणे) करण्यात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. येणाऱ्या काळात एकाही बांगलादेशी घुसखोराला मुंबईत राहू देणार नाही, त्यांना वेचून बाहेर काढू," असा इशारा त्यांनी दिला.
मुंबई ७ वर्षात झोपडपट्टीमुक्त होणार
मुंबईच्या विकासाबद्दल बोलताना फडणवीस यांनी मोठा दावा केला. "आम्ही घरांची डिलिव्हरी सुरू केली असून नवीन डेव्हलपर्सना संधी दिली आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, येत्या ७ ते ८ वर्षांत मुंबई पूर्णपणे स्लम फ्री (झोपडपट्टीमुक्त) होईल. पाणी तुंबण्याची समस्या सोडवण्यासाठी १०० टक्के पंपिंग स्टेशन्सचे काम युद्धपातळीवर सुरू आहे," असेही त्यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरेंवर निशाणा
"उद्धव ठाकरेंनी मेट्रो प्रकल्पात योगदान देण्यास नकार दिला होता, तेव्हा आम्ही एमएमआरडीएच्या माध्यमातून कामे पूर्ण केली. एमएमआरडीएने बीएमसीच्या कोणत्याही अधिकारावर गदा आणलेली नाही, उलट मुंबईचे इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत केले आहे. या व्यतिरिक्त एमएमआरडीएने कोणतेही अतिक्रमण केलेले नाही." असे म्हणत त्यांनी बीएमसी संपवण्याचे आरोप फेटाळून लावले.
मुंबईसाठी 'वन टिकेट' आणि 'इंटिग्रेटेड' प्रवास
सिंगल ॲप: मुंबईकर आता एकाच ॲपवर आपला पूर्ण प्रवासाची योजना तयार करू शकतील.
इंटिग्रेटेड तिकीट: रेल्वेपासून मेट्रोपर्यंत सर्व सार्वजनिक वाहतुकीसाठी एकच तिकीट वापरण्याची सुविधा देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
अटल सेतू आणि टनल: अटल सेतूला आता एका टनलच्या माध्यमातून जोडले जाणार आहे, ज्यामुळे प्रवास अधिक सोपा होईल.
वॉटर ट्रान्सपोर्ट: मुंबईत जलवाहतूक सुरू करून रस्त्यांवरील ताण कमी करण्यावर भर दिला जाणार आहे.