Join us
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरेंच्या गुहेत एकनाथ शिंदे यांची कठीण परीक्षा; भाजपा मदतीने तगडे आव्हान पार केले तर...

By यदू जोशी | Updated: January 9, 2026 07:47 IST

मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने एकनाथ शिंदे ठाकरेंच्या गुहेत कठीण परीक्षेला सामोरे जात आहेत. 

यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : एकनाथ शिंदे ... शिवसेनेतून बाहेर पडून भाजपसोबत गेले, मुख्यमंत्री झाले. २०२४ मध्ये महायुतीत त्यांच्या वाट्याला उपमुख्यमंत्रिपद आले. विधानसभेला त्यांनी उद्धवसेनेवर सहज मात केली. मात्र, मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने ते ठाकरेंच्या गुहेत कठीण परीक्षेला सामोरे जात आहेत. 

ठाकरे, मातोश्री, सेनाभवन अशी संपत्ती उद्धव ठाकरेंकडे आहे आणि हा सगळा ब्रँड जवळ नसतानाही शिंदेंनी ठाकरेंना आव्हान दिले आहे. बंडाच्या वेळी शिवसेनेचे ४० आमदार त्यांनी फोडले, मुख्यमंत्रीही झाले. मुंबईतील उद्धवसेनेचे साठहून अधिक माजी नगरसेवक त्यांनी आपल्यासोबत आणले.  

एकनाथ शिंदे हे तसे अजब रसायन. कधी झोपतात, कधी उठतात काही कळत नाही. पहाटे चारपर्यंत लोकांच्या गराड्यात राहून पुन्हा सकाळी सातला असे काही उत्साहाने सुरू होतात जणू काही त्यांनी दहा-एक तासांची गाढ झोप घेतली आहे. 

कार्यकर्त्यांच्या गराड्याची धुंदी या नेत्याला आहे. आपले सहकारी आणि कार्यकर्ते यांना सर्व प्रकारचे बळ वेळेत आणि कधी वेळेच्या आधीच पोहोचविणारा मोकळ्या हाताचा नेता ही त्यांची प्रतिमा उद्धव ठाकरे-राज ठाकरेंच्या तुलनेत त्यांना खूपच उजवी बनवते. ठाकरे बंधूंसारखे वक्तृत्व, चिमटे काढण्याचे कौशल्य शिंदेंकडे आधी अजिबातच नव्हते, पण राजकारणाचा व्याप सांभाळताना त्यांनी हे कौशल्य मिळविले. परवाच्या मुंबईतील संयुक्त सभेत सर्वांनाच त्याची प्रचिती आली. 

‘डबल ठाकरे ब्रँड’ विरुद्ध ‘ठाकरे’ असा हा सामना

या आधी लोकसभा, विधानसभेला शिंदेंचा सामना शिवसेनेचा विचार करता केवळ उद्धव ठाकरेंशी झाला होता. मात्र, महापालिकेत उद्धव-राज या बंधूजोडीचा मुकाबला ते पहिल्यांदाच करत आहेत. एका अर्थाने ‘डबल ठाकरे ब्रँड’ विरुद्ध ‘ठाकरे’ असा हा सामना आहे. अर्थातच शिंदेंच्या मागे भाजप आहे.एक सामान्य ऑटोरिक्षाचालक ते मुख्यमंत्री असा विलक्षण प्रवास केलेले शिंदे भाजपच्या मदतीने मुंबई महापालिका जिंकले तर त्यांच्या नेतृत्वाला प्रचंड झळाळी येईल. 

गमावण्याची चिंता न करता झोकून देणारा नेता... 

ठाकरेंशी सामना करताना मोठा भाऊ भाजपशीही त्यांचा कधीकधी सुप्त संघर्ष होत असतो. मुंबई, ठाण्यातील जागावाटप असो की आणखी काही, शिंदे आपल्या मनासारखे पदारात पाडून घेतात हा अनुभवही आहेच. 

पूर्वजांची पुण्याई नसलेले शिंदे हे नेहमीच एक वाक्य उच्चारतात, ते हे की ‘आपण काय घेऊन आलो आहोत, असे काय आहे की आपल्याला गमवायचे आहे?’... गमावण्याची चिंता न करता स्वत:ला झोकून देणारा हा नेता राजकीय जीवनातील सर्वांत मोठे आव्हान सध्या झेलतो आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Shinde faces tough test in Thackeray's stronghold; BJP support crucial.

Web Summary : Eknath Shinde, now CM with BJP support, confronts a crucial Mumbai election. Challenging the Thackeray brand without their resources, Shinde relies on his connection with workers and newfound political skills. He faces the 'double Thackeray brand' in a high-stakes battle where victory would solidify his leadership.
टॅग्स :महानगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक २०२६एकनाथ शिंदेशिवसेनाभाजपामहायुतीउद्धव ठाकरेराज ठाकरे