काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 09:18 IST2025-12-29T09:16:48+5:302025-12-29T09:18:59+5:30
BMC Election 2026 Congress News: वर्षा गायकवाड यांच्यासह मुंबई काँग्रेसचा एकही बडा नेता उपस्थित नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले.

काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
BMC Election 2026 Congress News: महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या युतीची रविवारी घोषणा झाली. मुंबईत २२७ जागांपैकी वंचित ६२ जागा लढणार आहे. तर महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला १० च्या आसपास जागा सोडून काँग्रेस १५० च्या आसपास जागा लढवणार आहे. राज्यातील इतर २८ महापालिकेतील आघाडी संदर्भात स्थानिक पातळीवर सकारात्मक निर्णय घेतला जाणार असून तसे अधिकार दोन्ही पक्षाने स्थानिक पातळीवर दिले आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांची अनुपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरल्याचे म्हटले जात आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे काँग्रेसने जाहीर केले होते. ठाकरे बंधूंच्या युतीवर शिक्कामोर्तब झाले असले, तरी काँग्रेसला सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ठाकरे बंधूंसह मुंबई मनपा निवडणूक लढवण्याची तयारी केली असली तरी जागावाटपाचे घोडे अडलेले पाहायला मिळत आहे. यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी या आघाडीची घोषणा केली. परंतु, यावेळी वर्षा गायकवाड उपस्थित नसल्याने नाराजीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
मुंबई काँग्रेसचा एकही बडा नेता उपस्थित नसल्याने आश्चर्य
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची आघाडी जाहीर होताना मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह मुंबई काँग्रेसचा एकही बडा नेता उपस्थित नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या आघाडीसाठी हर्षवर्धन सपकाळ आणि सचिन सावंत यांनी पुढाकार घेतला. वंचितला मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येकी १० जागा सोडण्यात आल्या आहेत. यावरून काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे. बहुतांशी राखीव प्रभाग वंचितला सोडण्यात आल्याने काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचे म्हटले जात आहे. वंचितसाठी ६२ जागा या जास्तच सोडण्यात आल्याचा सूरही उमटत आहे. वंचितला जागा सोडण्यात आल्यावर काँग्रेस १५०च्या आसपास जागा लढणार असून, अन्य काही मित्र पक्षांना जागा सोडण्याचा प्रस्ताव असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, दोन्ही पक्षांची वैचारिक भूमिका एकच आहे. दोन्ही पक्ष संविधानवादी आहेत, संविधानाला अभिप्रेत भारत घडवणे हा दोघांचा विचार आहे. १९९८ व १९९९ च्या निवडणुकीत दोन्ही पक्षात आघाडी झाली होती, आता २५ वर्षांनी दोन पक्ष एकत्र आले आहेत, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.