ट्रोल आर्मीकडून वर्षा गायकवाड यांचा अपमान मनुवादी वृत्ती दाखविणारा; काँग्रेसची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 05:50 IST2026-01-04T05:50:21+5:302026-01-04T05:50:21+5:30
मागासवर्गीय समाजातील एक महिला मुंबई काँग्रेसचे नेतृत्व करते, ही मनुवाद्यांची खरी पोटदुखी आहे, अशी टीका करण्यात आली आहे.

ट्रोल आर्मीकडून वर्षा गायकवाड यांचा अपमान मनुवादी वृत्ती दाखविणारा; काँग्रेसची टीका
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: सत्ताधाऱ्यांच्या ट्रोल आर्मीने मुंबई काँग्रेस अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड यांचा केलेला अपमान हा त्यांचा जातीयवादी चेहरा दाखविणारा प्रकार आहे. मागासवर्गीय समाजातील एक महिला मुंबई काँग्रेसचे नेतृत्व करते, ही मनुवाद्यांची खरी पोटदुखी आहे, अशी टीका काँग्रेस कमिटीचे सचिव व मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
ट्रोल गँगने गायकवाड यांच्यावर एका व्हिडीओद्वारे टीका करत, त्यांचा धर्म बदलविला आहे. त्या एका गरीब मुस्लीम व्यक्तीला पक्षाचे तिकीट देत असल्याचे दाखवून त्यांच्यावर तुष्टीकरणाचा आरोप केला आहे, असे सावंत म्हणाले. खरे तर सत्तेच्या राजकारणासाठी हिंदू धर्माचे नाव घेणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा हा हिंदू धर्माच्या तुष्टीकरणाचा प्रयत्न आहे. हिंदू धर्म हा सहिष्णू आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारा वसुधैव कुटुंबकम् हे तत्त्वज्ञान जगाला सांगणारा धर्म आहे. या धर्माला असहिष्णू आणि दुष्ट ठरविण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे. हा हिंदू धर्माचा अवमान आहे, असेही सावंत म्हणाले.