मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 09:08 IST2025-12-30T09:06:30+5:302025-12-30T09:08:46+5:30
BMC Election 2026 BJP News: दोन अपूर्णांक एकत्र आले म्हणून ते प्रत्येकवेळी पूर्णांक होतातच असे नाही. किंबहुना, दोन शून्यांची बेरीज एका शून्याएवढीच असते!

मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
BMC Election 2026 BJP News: राज्यातील २९ महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग येताना पाहायला मिळत आहे. राज्यात युती आणि आघाडीची खिचडी झालेली दिसत आहे. कोणता पक्ष कोणासोबत निवडणुका लढवणार हे जाहीर झाल्यानंतर अनेकांना आश्चर्य वाटत आहे. तर, उमेदवारीवरून अनेक पक्षांमध्ये नाराजी वाढत असून, बंडखोरी होत आहे. यातच राज्यासह अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत अखेर महायुतीचा फॉर्म्युला ठरला आहे. यानतंर आता भाजपा नेत्यांनी ठाकरे बंधूंना आकडेवारी दाखवत डिवचले आहे.
मुंबई महापालिकेत भाजप १३७ तर शिंदेसेना ९० जागा लढविणार आहे. काँग्रेसने ८७ जागा जाहीर केल्या तर उद्धव-राज यांच्या युतीने नावे जाहीर न करता ए बी फॉर्म देऊन टाकले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष पनवेल वगळता खऱ्या अर्थाने सर्वत्र स्वबळ अजमावत आहे. यावरून भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक्सवर एक पोस्ट करत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची आकडेवारी दिली आहे. यावरून ठाकरे बंधूंच्या युतीवार निशाणा साधला आहे.
मनसे–उद्धवसेना युती म्हणजे, आषाढीच्या घरी महाशिवरात्र!
मनसे–उद्धवसेना युती म्हणजे, आषाढीच्या घरी महाशिवरात्र! किंवा ग्रामीण म्हणीत सांगायचं तर— उघड्याशेजारी दुसरा उघडं गेल, रातभर थंडीने काकडून मेल… दोन भावांच्या ‘एकत्र येण्याचा आनंद’ म्हणून जो भावनिक महापूर दाखवला जातोय, तो ओसरल्यानंतर वास्तवातला मतांचा दुष्काळ दिसणारच आहे. कारण राजकारणात घोषणा नाही, आकडेवारी बोलते. निव्वळ भावना मतपेटी भरत नाहीत. थोडं वास्तव पाहूया… फक्त मुंबईची आकडेवारी, असे म्हणत केशव उपाध्ये यांनी टीका केली आहे.
गेल्या तीन विधानसभा निवडणुकांत भाजपा मुंबईत क्रमांक १ चा पक्ष
गेल्या तीन विधानसभा निवडणुकांत भाजपा मुंबईत क्रमांक १ चा पक्ष आहे. सर्वाधिक आमदार भाजपाचे निवडून येतात. लोकसभेत भाजपा–सेना युती विरुद्ध ठाकरे गट–मविआ अशी लढत होती.
मुंबई
भाजप, मते - १५,३०,८५३
शिवसेना, मते - ११,४३,३८०
- महायुतीची मते - २६,७४,२३३
ठाकरे गट – १६,९४,३२६
काँग्रेस – ७,६८,०८३
- माविआची यांना मिळालेली मते – २४,६२,४०९
- २०२५ मध्ये मनसे विधानसभेत स्वतंत्रपणे लढेल.
भाजप - १८,९०,९३१
शिवसेना - १०,०९,०८३
- महायुती - २९,००,०२०
ठाकरे गट - १३,९५,३०३
काँग्रेस - ६,८२,५३२
- मविआ - २०,७७,८३५
मनसे - ४,१०,७३५
हिशेब सरळ आहे.
ठाकरे + मनसे = १८,०२,६७८
महापालिकेत ठाकरे गटासोबत कॉंग्रेस नाही, फक्त ठाकरे–मनसे युती आहे. आणि ही आकडेवारी थेट सांगते, ही मते भाजपाच्या मतांपेक्षा कमी आहेत. म्हणूनच राजकारणात लक्षात ठेवा. दोन अपूर्णांक एकत्र आले म्हणून ते प्रत्येकवेळी पूर्णांक होतातच असे नाही. किंबहुना, दोन शून्यांची बेरीज एका शून्याएवढीच असते!, असे सांगत केशव उपाध्ये यांनी ठाकरे बंधूंवर हल्लाबोल केला.
मनसे–उबाठा युती म्हणजे,
आषाढीच्या घरी महाशिवरात्र!
किंवा ग्रामीण म्हणीत सांगायचं तर—
उघड्याशेजारी दुसरा उघडं गेल,
रातभर थंडीने काकडून मेल…
दोन भावांच्या ‘एकत्र येण्याचा आनंद’ म्हणून जो भावनिक महापूर दाखवला जातोय, तो ओसरल्यानंतर वास्तवातला मतांचा दुष्काळ दिसणारच आहे.
कारण…— Keshav Upadhye (@keshavupadhye) December 25, 2025