“स्वतः विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आलेत, आधी उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा”: आशिष शेलार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 06:06 IST2026-01-05T06:05:17+5:302026-01-05T06:06:09+5:30
उद्धव ठाकरे १४ मे २०२० रोजी विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आलेत, आधी उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा आणि मगच बिनविरोध निवडीवर बोलावे, असा टोला आशिष शेलारांनी लगावला.

“स्वतः विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आलेत, आधी उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा”: आशिष शेलार
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: जे उद्धव ठाकरे १४ मे २०२० रोजी स्वतः विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले, तेच आज सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून महायुतीतर्फे बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांच्या निवडीवर प्रश्न उपस्थित करत आहेत, अशी टीका भाजपचे मुंबई निवडणूक प्रभारी, मंत्री आशिष शेलार यांनी केली. आधी स्वतःचा राजीनामा द्यावा आणि मगच बिनविरोध निवडीवर बोलावे, असा टोलाही त्यांनी लगावला.
मागाठाणे येथील प्रचारसभेत बोलताना शेलार यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी आ. प्रवीण दरेकर, संजय उपाध्याय, माजी खा. गोपाळ शेट्टी तसेच महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून, रविवार हा प्रचाराचा दिवस ठरला. मंत्री आशिष शेलार यांनी दौरा करत विविध मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार केला. बोरिवली पश्चिम आणि ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरातही त्यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार केला.