मुंबईत मनसेला खिंडार, एकाचवेळी ११ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे; भाजपात प्रवेश, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 15:16 IST2026-01-02T15:14:26+5:302026-01-02T15:16:03+5:30
BMC Election 2026 MNS BJP News: मातोश्रीचा प्रभाव असलेल्या परिसरातील ११ मनसे पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंना जय महाराष्ट्र करत भाजपात प्रवेश केला.

मुंबईत मनसेला खिंडार, एकाचवेळी ११ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे; भाजपात प्रवेश, कारण काय?
BMC Election 2026 MNS BJP News: महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना दिसून आलेल्या बंडखोरीमुळे एकीकडे राजकीय वातावरण तापले असताना आता मराठी आणि अमराठी वाद पेटला आहे. मराठीच्या मुद्द्यावरून सुमारे २० वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. यानंतर सुरुवातीला बेस्टची निवडणूक आणि आता मुंबई मनपा निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय ठाकरे बंधूंनी घेतला आहे. मुंबई मनपा निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. एकीकडे कल्याण डोंबिवली आणि मुंबई मनपा निवडणुकीत मनसे उमेदवारांनी अर्ज मागे घेत असताना दुसरीकडे मातोश्रीचा प्रभाव असलेल्या वांद्रे येथे ११ मनसे पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंना जय महाराष्ट्र करत भाजपात प्रवेश केला.
मुंबईत मनसेच्या ११ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. वांद्रेतील प्रभाग ९७ हा ठाकरेंच्या उमेदवाराला गेल्याने, तर प्रभाग ९८ मधील मनसेचा उमेदवार मान्य नसल्याने ११ पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. मनसेच्या सर्वच प्रमुख जुन्या नेत्यांचा भाजपात पक्षप्रवेश झाला आहे. भाजपा नेते आणि मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत मनसे पदाधिकाऱ्यांनी भाजपा प्रवेश केला.
मुंबईत मनसेला खिंडार, ११ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपविभाग अध्यक्ष विजय काते, शाखा अध्यक्ष जितेंद्र गावडे, शाखा सचिव भाऊराव विश्वासराव, उपशाखा अध्यक्ष विजय कुलकर्णी, ॲड. अशोक शुक्ला, नरेंद्र कौंडीपूजला, प्रविण पाटील, रोहित गोडीया, अजय कताळे, दत्ताप्रसाद देसाई, मनविसे उपविभाग अध्यक्ष आकाश आवळेकर यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांचे पक्षात स्वागत केले, अशी माहिती आशिष शेलार यांनी एक्सवर पोस्ट करून दिली.
दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीत उभ्या राहिलेल्या मनसेच्या ५३ उमेदवारांनी शिवतीर्थ निवासस्थानी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. कितीही आमिषे आली तरी त्याला बळी पडू नका. मलाही अनेक ऑफर आल्या होत्या. मात्र, ऑफर देणाऱ्यांना मी पळवून लावले होते. विजयी होण्यासाठी पराक्रमाची पराकाष्ठा करा, असा सल्ला राज यांनी उमेदवारांना दिला. शिवतीर्थावर सर्व उमेदवारांचे शर्मिला ठाकरे यांनी औक्षण केले. यानंतर उमेदवारांना मार्गदर्शन करताना मुंबई मराठी माणसाची आहे. तिला व मराठीला वाचविण्यासाठी आपल्याकडे ही शेवटची संधी आहे, असे राज म्हणाले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सांताक्रूझ येथील उपविभाग अध्यक्ष विजय काते, शाखा अध्यक्ष जितेंद्र गावडे, शाखा सचिव भाऊराव विश्वासराव, उपशाखा अध्यक्ष विजय कुलकर्णी, ॲड. अशोक शुक्ला, नरेंद्र कौंडीपूजला, प्रविण पाटील, रोहित गोडीया, अजय कताळे, दत्ताप्रसाद देसाई, मनविसे उपविभाग अध्यक्ष… pic.twitter.com/Q7oMDEygVl
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 2, 2026