"मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथं काय हवं हे कळणार नाही"; राज ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 09:52 IST2026-01-08T09:15:37+5:302026-01-08T09:52:41+5:30
जेव्हा बाहेरचे मुंबईत येतात तेव्हा त्यांना इथले प्रॉब्लेम दिसत नाही अशी टीका राज ठाकरे यांनी केली,

"मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथं काय हवं हे कळणार नाही"; राज ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा
Raj Thackeray: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये मुंबईकर विरुद्ध बाहेरचे असा नवा वाद छेडला आहे. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अनेक मोठे नेते हे मूळचे मुंबईचे नसल्याने त्यांना मुंबईकरांच्या वेदना आणि प्रश्नांची जाण नाही, असा घणाघाती आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. यामुळे निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
महेश मांजरेकर आणि संजय राऊत यांनी घेतलेल्या एका विशेष मुलाखतीत राज ठाकरे यांनी मुंबईच्या सद्यस्थितीवर भाष्य केले. मुंबई महानगरपालिकेच्या मतदानाला आता काहीच दिवस उरले असताना राज ठाकरेंनी मतदारांच्या भावनांना हात घातला आहे. राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणला आहे. सध्याचे राज्यकर्ते हे मुंबईबाहेरून आलेले आहेत त्यामुळे त्यांना इथल्या स्थानिकांच्या समस्या कधीच समजणार नाहीत, असं म्हणत मुंबईच्या निर्णयप्रक्रियेत स्थानिकांचा प्रभाव कमी होत असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटलं.
"देवेंद्र फडणवीस नागपूरचे आहेत. बाकीचेही सगळे बाहेरचे. मी एकदा स्वीडनला गेलो होतो. तिथे मी तो देश पाहत होतो. गाड्या फिरतात, सगळ्यांकडे उत्तम नोकऱ्या आहेत, सुंदर रस्ते आहेत, उत्तम निसर्ग आहे. सगळं सगळं व्यवस्थित छान. तो देश पाहताना माझ्या मनात पहिला प्रश्न आला की, इथला विरोधी पक्ष काय करतो? म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर काय सांगत असेल, की मी तुम्हाला हे देईन, मी तुम्हाला ते देईन. या कल्पनेच्या मी बाहेर होतो. मुंबईत मुंबईकरांना काय पाहिजे, हे मला असं वाटतं की तुम्हाला मुंबईत जन्माला आल्याशिवाय कळणार नाही. बाहेरून येऊन जेव्हा तुम्ही एखादा देश बघता, शहर बघता ना, तुम्हाला समजणारच नाहीत की तिथले प्रश्न काय आहेत ते. तुमचा गृहनिर्माण मंत्री किंवा पीडब्ल्यूडी मिनिस्टर किंवा अजून कोणीतरी हे जेव्हा बाहेरचे मुंबईत येतात, तेव्हा त्यांना प्रश्न पडतो की, साला प्रॉब्लेम काय आहे या शहराचा? रस्ते आहेत, हॉस्पिटल आहेत, दिवे आहेत, शाळा आहेत, कॉलेज आहेत, २४ तास पाणी आहे. मग इथले प्रॉब्लेम काय आहेत? कारण तो कम्पॅरिजन करतो त्याच्या इथे असलेल्या रस्त्यांशी, त्याच्या लोड लोडिंगशी, त्याच्याकडच्या सगळ्या गोष्टींशी. त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम होतात. तुमची मानसिकता कशी आहे यावर सगळं अवलंबून आहे," असं राज ठाकरे म्हणाले.
हा आमच्या नाही तर मराठी माणसाच्या अस्तित्वाचा विषय- राज ठाकरे
"काही गोष्टी का घडतात, काय झालं? कशा घडल्या? या गोष्टी आता सोडून दिल्या पाहिजेत. मी महेश मांजरेकरांच्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं, की कोणच्याही भांडण आणि वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आणि आज संकट महाराष्ट्रावर, मुंबईवर आणि महाराष्ट्रातील अनेक शहरांवर आहे. जे संकट आहे ते मराठी माणसाला समजलं आहे की काय प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे. ही एकच गोष्ट एकत्र येण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण असून, आज हा आमच्या अस्तित्वाचा विषय नसून हा मराठी माणसाच्या अस्तित्वाचा विषय आहे. ही परिस्थिती आज मुंबई, ठाणे आणि मुंबई महानगर क्षेत्रावर येऊन ठेपली आहे. मी एमएमआर मुद्दाम बोलतोय आणि त्याच सर्व गोष्टींसाठी आपण एकत्र आलो असून, आज एकत्र नाही आलो आणि आज या गोष्टींचा सामना नाही केला तर, महाराष्ट्र आम्हाला माफ नाही करणार," असेही राज ठाकरे म्हणाले.