मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 17:24 IST2025-11-10T17:21:52+5:302025-11-10T17:24:02+5:30
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची वाढती जवळीक पाहता महापालिका निवडणुकीत मनसे-उद्धवसेनेची युती होईल अशी चर्चा सुरू आहे. मात्र त्याबाबत कुठलीही औपचारिक घोषणा झाली नाही.

मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजले आहे. त्यातच महापालिका निवडणुकीसाठी पुढील काही दिवसांत घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. मुंबईत सत्ताधारी घटक पक्ष महायुती म्हणून रिंगणात उतरणार आहेत तर दुसरीकडे ठाकरे बंधू यांची जवळीक पाहता काँग्रेस महाविकास आघाडीपासून दूर जात असल्याचे चिन्ह आहेत. मुंबईत काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवावी अशी मागणी स्थानिक काँग्रेस नेत्यांची आहे. दुसरीकडे मनसेनेही मुंबई महापालिका निवडणुकीत पक्षाचं प्राबल्य असलेल्या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे.
महापालिकेतील युतीबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, आमच्या स्थानिक नेत्यांनी मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मनसेसोबत जाण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही, विचार नाही हे स्पष्ट आहे. मुंबईची तिजोरी खाली झालीय, मुंबईत भ्रष्टाचार प्रचंड वाढला आहे. महापालिकेच्या आवश्यक प्रश्नांना घेऊन आम्ही लढू. स्थानिक पातळीवर कुणाशी युती करायची किंवा नाही याचे अधिकार सर्वच ठिकाणी तिथल्या स्थानिक नेत्यांना दिले आहेत. भाजपा, शिंदे गट आणि अजित पवारांसोबत युती नको, मात्र जे घटक महाविकास आघाडीत नाही त्यांच्यासोबत युती करण्यास काही हरकत नाही अशी भूमिका काँग्रेसने घेतल्याचे त्यांनी सांगितले.
तर मनसे २२७ जागांवर लढण्याची तयारी करत आहे. अजून आम्ही कुणाशी युतीबाबत चर्चा केली नाही. हा निर्णय पक्षाचे प्रमुख राज ठाकरे घेतील. ज्यावेळी ते युतीवर निर्णय घेतील तेव्हा त्यावर अधिक भाष्य करता येईल अशी भूमिका मनसे नेते आणि मुंबईचे शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी घेतली आहे.
मनसेने १२५ जागांची यादी केली तयार
दरम्यान, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची वाढती जवळीक पाहता महापालिका निवडणुकीत मनसे-उद्धवसेनेची युती होईल अशी चर्चा सुरू आहे. मात्र त्याबाबत कुठलीही औपचारिक घोषणा झाली नाही. त्याआधीच मनसेने जागावाटपाबाबत एक सर्व्हेक्षण केले आहे. त्यात मुंबई महापालिकेच्या २२७ जागांपैकी १२५ जागांवर मनसेची मजबूत पकड असल्याचं समोर आले आहे. त्या १२५ जागांवर मनसेकडे चांगले उमेदवार आहेत जे निवडणुकीच्या मैदानात उतरू शकतात. या १२५ जागांमध्ये प्रामुख्याने माहीम, दादर, परेल, भायखळा, जोगेश्वरी, भांडुप, घाटकोपर यासारखे मराठी बहुल भाग आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेला या भागात चांगली मते मिळाली होती. त्यामुळे जर उद्धव ठाकरेंसोबत युती झाली तर मनसे १२५ जागांवर लढणार का असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.