BJP's 'Mission BMC'; Determination of Shiv Sena deportation | भाजपचे ‘मिशन बीएमसी’; शिवसेनेच्या हद्दपारीचा निर्धार
भाजपचे ‘मिशन बीएमसी’; शिवसेनेच्या हद्दपारीचा निर्धार

मुंबई : महाविकास आघाडीच्या खेळीमुळे राज्यात सत्तेपासून दूर व्हाव्या लागलेल्या भाजपने आता संघटनात्मक बांधणीकडे मोर्चा वळविला आहे. रविवारी मुंबईत पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची तब्बल पाच तास बैठक झाली. भाजप स्वबळावर मुंबई महापालिकेची निवडणूक लढवणार असून आगामी महापौर आमचाच असेल, असे सांगत भाजपने मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे.

दादर येथील भाजप कार्यालयात मुंबई भाजपची बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री व्ही. सतीश, विनोद तावडे आणि आशिष शेलार यांच्यासह मुंबईतील प्रमुख नेते बैठकीस हजर होते. या बैठकीत मुंबईतील संघटनात्मक बांधणीवर चर्चा झाली. डिसेंबर अखेरपर्यंत मुंबईतील साडेनऊ हजार बुथप्रमुख, २२७ वॉर्ड अध्यक्ष, ३६ विधानसभा मतदारसंघातील अध्यक्ष आणि सहा लोकसभा क्षेत्रातील जिल्हाध्यक्षांची नियुक्ती किंवा फेरनियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

अमृता फडणवीस यांचा शिवसेनेवर निशाणा

वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून भाजप व शिवसेनेत घमासान सुरू असतानाच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी ट्विट करून या प्रकरणी शिवसेनेवर दुटप्पीपणा व कमिशनखोरीचा आरोप केला. तर, शिवसेनेने त्यांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर देत अमृता यांना 'लवकर बऱ्या व्हा'(गेट वेल सून) असा सल्ला दिला आहे.

‘खडसे भाजप सोडणार नाहीत’

रोहिणी खडसे यांच्या पराभवात पक्षातील नेत्यांचा हात असल्याची एकनाथ खडसे यांची भावना आहे. त्यांनी याचे काही पुरावेही मला दिले. रोहिणी खडसे यांच्या पराभवात भाजप नेत्यांचा हात असल्यास त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल. खडसे ३० वर्षांपासून भाजपमध्ये आहेत. महाराष्ट्रात ज्यांनी भाजप वाढवला त्यात खडसे यांचे नावही आघाडीवर आहे. ते भाजप सोडण्याची शक्यता नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Web Title:  BJP's 'Mission BMC'; Determination of Shiv Sena deportation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.