विधान परिषद उपसभापतीपदी भाजपतर्फे भाई गिरकर यांची उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 16:10 IST2020-09-07T16:09:08+5:302020-09-07T16:10:43+5:30
कोरोनानिमित्ताने अनेक निर्बंध असताना सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने आज विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या अधिवेशनातही विधान परिषद उपसभापतीपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला.

विधान परिषद उपसभापतीपदी भाजपतर्फे भाई गिरकर यांची उमेदवारी
मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक घाईघाईने जाहीर झाली असून, भाजपतर्फे ज्येष्ठ नेते विजय उर्फ भाई गिरकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
कोरोनानिमित्ताने अनेक निर्बंध असताना सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने आज विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या अधिवेशनातही विधान परिषद उपसभापतीपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भाजपतर्फे ज्येष्ठ नेते भाई गिरकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.
आमदार भाई गिरकर यांनी आज विधिमंडळात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी आमदार सुरेश धस, निरंजन डावखरे, प्रसाद लाड, रमेश पाटील आदींची उपस्थिती होती. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले आहे. कोरोनामुळे केवळ दोनच दिवस कामकाज होईल. आधी अधिवेशन लांबणीवर टाकले होते. मात्र, आता सोमवारपासून ते पार पडेल.
उपाध्यक्ष पाहत आहेत कामकाज
विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे ते या अधिवेशनासाठी उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यामुळे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन पार पडत आहे, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी दिली.
बैठक व्यवस्थेत बदल
सभागृहतील बैठक व्यवस्थाही बदलली आहे. एका सदस्यानंतर दोघांची जागा सोडली जाणार आहे. त्यामुळे काही जणांना प्रेक्षक गॅलरीत देखील बसविण्यात आले आहे.