पक्षात नव्याने प्रवेश केलेल्यांना भाजप १० ते १५ जागा देणार - गिरीश महाजन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 01:42 AM2019-09-10T01:42:24+5:302019-09-10T06:40:44+5:30

गिरीश महाजन; ‘लोकमत पॉलिटिकल आयकॉन्स ऑफ मुंबई’चे प्रकाशन

BJP will give 10 to 15 seats to newly joined in party - Girish Mahajan | पक्षात नव्याने प्रवेश केलेल्यांना भाजप १० ते १५ जागा देणार - गिरीश महाजन

पक्षात नव्याने प्रवेश केलेल्यांना भाजप १० ते १५ जागा देणार - गिरीश महाजन

googlenewsNext

मुंबई : राज्यात विधानसभेच्या २८८ जागा असून, यामधील ८८ पैकी ७० जागा निवडून आणू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी मागील विधानसभा निवडणुकीदरम्यान सांगितले होते आणि त्यानुसार काम करत विजय संपादन केला. आता आमच्या पक्षात प्रवेशासाठी रीघ लागली आहे. आम्ही सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमच्याकडे विधानसभेच्या १२३ जागा आहेत. १० ते १५ जागा आमच्या पक्षात नव्याने प्रवेश करत असलेल्यांना निवडणुकीवेळी देऊ, असे सूतोवाच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले. दरम्यान, पक्षात प्रवेश करत असलेल्यांपैकी चार ते पाच जणच नवे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकमत पॉलिटिकल आयकॉन्स ऑफ मुंबई’ या ‘कॉफी टेबल बुक’चा प्रकाशन सोहळा सोमवारी मुंबईतील नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात रंगला. त्या वेळी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून स्वत:चे विशेष स्थान निर्माण केलेल्या मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि नवी मुंबईतील नेते मंडळींचा गौरव करण्यात आला. या वेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन बोलत होते. या सोहळ्यास व्यासपीठावर वनाधिपती, माजी आमदार विनायकदादा पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, शालेय शिक्षण आणि क्रीडामंत्री आशिष शेलार, महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे मान्यवर उपस्थित होते.

लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर आणि लोकमतचे साहाय्यक उपाध्यक्ष विजय शुक्ला यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकमतच्या मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर यांनी केले.

‘शिवनेरीहून वर्षा बंगल्याकडे जाण्याचा मार्ग सुकर’
भारतीय जनता पक्षामध्ये सुरू असलेल्या प्रवेशाबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नास उत्तर देताना गिरीश महाजन म्हणाले, मी राहत असलेल्या ‘शिवनेरी’ या बंगल्यालगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘वर्षा’ बंगला आहे. ‘शिवनेरी’हून ‘वर्षा’ बंगल्याकडे जाण्याचा मार्ग कदाचित सुकर असल्याने या माध्यमातून पक्ष प्रवेशाचे प्रमाण वाढले आहे, असे गिरीश महाजन मिश्कीलपणे म्हणाले. महाजन यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला; शिवाय टाळ्यांचा वर्षावही झाला.
 

Web Title: BJP will give 10 to 15 seats to newly joined in party - Girish Mahajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.