"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 19:22 IST2025-07-12T19:18:49+5:302025-07-12T19:22:16+5:30

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर वाईट वाटल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं.

BJP state president Ravindra Chavan said that he felt bad after Eknath Shinde became the Chief Minister | "एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट

"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट

Ravindra Chavan on Eknath Shinde: तीन वर्षांपूर्वी महाविकास आघाडीला बसलेल्या धक्क्यानंतर सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले होतं. ३० जून २०२२ रोजी भाजपा आणि शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेला एकनाथ शिंदे यांच्या गटाने एकत्र येऊन सरकार स्थापन केलं होतं. सर्वात मोठा पक्ष असल्याने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील असं सर्वानाच वाटत होतं. मात्र एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि सर्वांनाच धक्का बसला. असाच धक्का भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनाही बसला होता. रवींद्र चव्हाण हे इतके नाराज झाले की ते थेट घरी निघून गेले होते. एका मुलाखतीमध्ये बोलताना रवींद्र चव्हाण यांनी हा गौप्यस्फोट केला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केली आणि राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झालं. उद्धव ठाकरे पायउतार झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं सर्वांना वाटत होतं. मात्र, राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली आणि मोठा धक्का दिला. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील असं जाहीर करुन टाकलं. या निर्णयानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आपल्याला वाईट वाटल्याचे म्हटलं. एनडीटीव्ही मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये रवींद्र चव्हाण यांनी याबाबत खुलासा केला आहे.

काय म्हणाले रवींद्र चव्हाण?

"असा कोणता कार्यकर्ता असेल ज्याला वाटेल की, त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री होऊ नये. मी एक छोटा कार्यकर्ता आहे. त्यावेळी मला असं वाटत होतं की, सत्ता बदल होईल तेव्हा १०० टक्के देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हेच वाटत होतं. पण जेव्हा राज्यपालांकडे गेलो त्यावेळी इतर कार्यकर्त्यांसारखा मलाही धक्का बसला की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार आहेत. त्यावेळी मला वाईट वाटलं आणि हे सगळ्यांना माहिती आहे. दुःख वाटल्याने घरी निघून गेलो. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांसोबत माझी चर्चा झाली आणि ११.३० वाजता पुन्हा एकनाथ शिदेंसोबत बोलायला लागलो. मला आणि कार्यकर्त्यांना वाईट वाटल्याचे देवेंद्र फडणवीसांना सांगितले होते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळात मी होतो. त्यामुळे कुणाचा रोष वगैरे असं काही होत नाही. मनात वाटतं ते बोलून दाखवणं हे काही चूक नाही," असं रवींद्र चव्हाण म्हणाले.
 

Web Title: BJP state president Ravindra Chavan said that he felt bad after Eknath Shinde became the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.