एकमेकांना डावलून सत्तेची भाजप-शिवसेनेची तयारी!; भाजपाची पुन्हा एकदा नवी खेळी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 01:03 AM2019-11-02T01:03:42+5:302019-11-02T06:49:27+5:30

शिवसेनेला प्रतीक्षा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रतिसादाची

BJP-Shiv Sena ready to shake power! BJP's new one again | एकमेकांना डावलून सत्तेची भाजप-शिवसेनेची तयारी!; भाजपाची पुन्हा एकदा नवी खेळी

एकमेकांना डावलून सत्तेची भाजप-शिवसेनेची तयारी!; भाजपाची पुन्हा एकदा नवी खेळी

Next

मुंबई : मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसलेल्या शिवसेनेने भाजपला बाजूला सारून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने सरकार स्थापन करता येते का, याची चाचपणी सुरू केली असून ‘आम्ही बहुमत सिद्ध करु शकतो’ असा इशारा दिला आहे. भाजपने २०१४ प्रमाणे एकट्यानेच शपथविधी ५ किंवा ६ नोव्हेंबरला घेण्याची तयारी चालविली आहे. पण दोघांत सत्तावाटपाच्या चर्चेत ‘डेडलॉक’ कायम आहे.

शिवसेनेचे नेते खा.संजय राऊत यांनी राज्यातील जनता शिवसेनेचा मुख्यमंत्री पाहू इच्छिते, पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल असे सांगितल्याने तणाव अधिक वाढला आहे. शिवसेनेचे हे दबावतंत्र असून शिवसेनेला सोबत न घेता ५ किंवा तारखेला देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा व काही मंत्र्यांचा शपथविधी करायचा, अशा हालचाली भाजपने सुरू केल्या आहेत.

फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला मान्य नसेल तर पर्याय खुले आहेत. फॉर्म्युल्याचे पालन होणार असेल तरच भाजपसह सत्ता स्थापनेची तयारी आहे, असे खा. संजय राऊत म्हणाले. अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद व निम्मी मंत्रिपदे यावर शिवसेना अडली असल्याचे त्यामुळे स्पष्ट झाले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने सरकार स्थापण्याचा पर्याय शिवसेनेने खुला ठेवला आहे. पण काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेला शब्द दिलेला नाही. भाजपने शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद व १६ मंत्रिपदे देण्याची आॅफर तीन दिवसांपूर्वीच दिली आहे. संजय राऊत यांच्या विधानांवर प्रतिक्रिया देताना भाजपचे आ. प्रसाद लाड म्हणाले की, राऊत यांची प्रतिक्रिया अधिकृत नाही. त्यांना शिवसेनेने तसे अधिकार दिलेले नाहीत. भाजपाध्यक्ष अमित शहा शनिवारी उद्धव यांच्याशी चर्चेसाठी येणार असल्याचे वृत्तही अफवाच असल्याचे स्पष्ट झाले.

वाट पाहू नका...
शिवसेनेची वाट न पाहता स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली करा, असे स्पष्ट आदेश भाजप श्रेष्ठींनी राज्यातील नेतृत्वाला दिले असल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांनी दिली.

‘...तर राष्ट्रपती राजवट लागेल’
नवीन विधानसभा ९ तारखेच्या आत अस्तित्वात आली पाहिजे, ती जर आली नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, असे विधान वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. - वृत्त/राज्य

मुंबई सोडू नका : भाजपने आपल्या १०५ आमदारांना ५ नोव्हेंबरपर्यंत कोणीही मुंबई सोडून बाहेर जाऊ नका, असे आदेश दिले आहेत. यामुळे दिवाळीनंतर भाजपचे सर्व आमदार मुंबईमध्येच तळ ठोकून आहेत.

राज्यकर्त्यांचा पोरखेळ सुरू; आम्ही विरोधी बाकावरच - पवार
शिवसेनेचे संजय राऊत यांनी माझी भेट घेतली आहे. मात्र भाजप-सेनेला जनतेने स्पष्ट बहुमत दिले आहे. भाजपच्या कमी झालेल्या जागा हा सत्तेचा उन्माद आहे, हे जनतेने दाखवून दिले आहे. जनतेचा निर्णय आम्ही मान्य करीत असल्याने विरोधी बाकावर बसणेच आम्ही पसंत करू. आज जे काही चाललंय तो पोरखेळ आहे. राज्य अडचणीत असताना राज्यकर्त्यांना जबाबदारी पार पाडता येत नाही, ही खेदाची बाब आहे. -शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

फाटे फुटू नयेत म्हणून शपथविधी लगेच करावा
२०१४ मध्येही आधी भाजपच्याच मंत्र्यांचा ३१ ऑक्टोबरला शपथविधी झाला होता आणि काही दिवसांनंतर शिवसेना सत्तेत सहभागी झाली होती. शपथविधीची तारीख जितकी लांबेल तितके फाटे फुटतील. त्यापेक्षा शपथविधी लगेच करावा असा मतप्रवाह भाजपमध्ये आहे. मात्र, ५ तारखेच्या शपथविधीसाठी वानखेडे स्टेडियम बूक केल्याच्या वृत्ताचा भाजपने इन्कार केला.

परतीच्या पावसाने राज्य हवालदिल, नेते मात्र सत्ताकारणात मश्गूल
अवकाळी पावसाच्या अस्मानी संकटाने लाखो शेतकरी, कामकऱ्यांना अक्षरश: हवालदिल असताना दुसरीकडे विविध पक्षांचे नेते सत्ताकारणाचा मेळ बसविण्यात मशगूल असल्याची संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियात उमटली आहे. महायुतीला जनतेने सत्तेसाठी कौल दिला असताना मुख्यमंत्री, मंत्रिपदांवरून अडून बसत जनतेला वेठीस धरले जात असल्याबद्दलही सोशल मीडियात संताप व्यक्त होत आहे. अयोध्येतील जमीन मालकीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लवकरच अपेक्षित आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात स्थिर सरकार तातडीने स्थापन होणे आवश्यक असल्याची प्रतिक्रियाही उमटत आहे.

उद्धव ठाकरे रविवारी मराठवाड्यात
अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यााठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रविवारी (दि.३) मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. कानडगाव (ता.कन्नड), गारज (ता.वैजापूर) येथील पीक परिस्थितीची पाहणी ते करतील. दुपारी १ वाजता औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयात अधिकाऱ्यांशी त्यांची आढावा बैठक आहे.

Web Title: BJP-Shiv Sena ready to shake power! BJP's new one again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.