Join us  

राष्ट्रवादीने आधी आपल्या नेत्यांना आवरावं, मग आम्हाला सल्ला द्यावा; सुजय विखेंनी सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 10:58 AM

राष्ट्रवादीचे कित्येक आमदार आणि मंत्री दररोज वेगवेगळ्या रस्त्यांचे भूमिपूजन, उद्घाटन करतात.

मुंबई: राम मंदिर भूमिपूजनावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. राम मंदिर बांधल्याने कोरोना जाईल असं काहींना वाटतं असं विधान शरद पवार यांनी केलं होतं. शरद पवारांच्या या विधानानंतर भाजपाकडून निषेध करण्यात आला होता. यावर आता भाजपाचे खासदार सुजय विखे पाटील यांनी देखील शरद पवारांनी केलेल्या राम मंदिराच्या विधानावरुन निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादीचे कित्येक आमदार आणि मंत्री दररोज वेगवेगळ्या रस्त्यांचे भूमिपूजन, उद्घाटन करतात. त्यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे त्यांनी भूमिपूजन थांबवावी. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. त्यानंतर आम्हाला सल्ले द्यावे असा टोला सुजख विखे पाटील यांनी लगावला आहे. राम मंदिर आपल्या देशाच्या आस्थेचा प्रश्न असून त्याचा आम्हाला अभिमान आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने भाजपाला सल्ला देण्यापेक्षा उद्घाटनासाठी गर्दी जमवत असलेल्या नेत्यांना नियंत्रणात आणावे, असा टीका सुजय विखे पाटील यांनी लगावला आहे.

कोरोनाच्या परिस्थितीबाबत बोलताना सुजय विखे पाटील म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्यात करोना संसर्गाची परिस्थिती हाताबाहेर जात आहे. मी अनेकवेळा लॉकडाऊन बाबत डॉक्टर या नात्याने भूमिका मांडली. पण मलाही मर्यादा आहेत. प्रशासन माझे ऐकत नाही. मी एकटा पडलोय, असं सुजय विखे पाटील यांनी सांगितले. तसेच आता जनतेनेच स्वतः कर्फ्यू लावून घरात थांबण्याचे आवाहन मी करू शकतो, असं सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

काय म्हणाले होते शरद पवार?

राम मंदिराच्या भूमिपूजनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना शरद पवारांनी टोला लगावला होता. काही लोकांनी वाटतेय की राम मंदिरामुळे कोरोना बरा होईल. कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावे हे त्यांनी ठरवायला हवे. सध्या कोरोनावर लक्ष द्यायला हवे. कोरोनाच्या संकटात सापडलेल्या लोकांनी बाहेर काढायला हवे. कदाचित राम मंदिरामुळे कोरोना जाईल असे त्यांना वाटत असावे. कोरोनामुळे लॉकडाऊन केल्याने देशाची अर्थव्यवस्था खचली आहे. त्यावर मोदींनी लक्ष द्यावे, असे मला वाटत असल्याचे पवार म्हणाले. आपले खासदार याबाबत जिथे गरजेचे आहे तिथे सरकारचे लक्ष वेधतील असंही पवार यांनी सांगितलं होतं.

राम मंदिराचे ई-भूमिपूजन करा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्टला अयोध्येतील राम मंदिराच्या भूमीपूजनचा कार्यक्रम होणार आहे. मात्र, कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ई-भूमीपूजन करावे, असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता.

टॅग्स :सुजय विखेभाजपाशरद पवारउद्धव ठाकरेराष्ट्रवादी काँग्रेसराम मंदिरमहाराष्ट्र सरकारअहमदनगर