BJP leader Vinod Tawade questions to Urmila Matondkar | अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी का करता? तावडेंचा ऊर्मिला मातोंडकरांना प्रश्न 
अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी का करता? तावडेंचा ऊर्मिला मातोंडकरांना प्रश्न 

मुंबई - अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याचा कांगावा करत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे सांगणा-या कॉंग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्यासमोरच कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदी मोदी अशा घोषणा देणाऱ्या युवकांना चोप दिला. या मारहाणीमध्ये एका युवतीलाही मार लागला, मग तुम्हीच अभिव्यक्ती स्वातंत्र्यांची गळचेपी कशी काय करता असा प्रश्न भाजपा नेते विनोद तावडे यांनी उत्तर मुंबईच्या काँग्रेस उमेदवार ऊर्मिला मातोंडकर यांना केला.

भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना विनोद तावडे म्हणाले की, आज सकाळी कॉंग्रेसची प्रचार यात्रा सुरु असताना बोरिवली रेल्वेस्थानकावरील काही कार्यकर्त्यांनी मोदी..मोदी...अशा घोषणा दिल्या. पण त्यावेळी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देणा-या युवकांना मारहाण केली, यामध्ये युवतीलाही मार लागला. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पुणे येथील सभेतही मोदी मोदी अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. पण त्यावेळी काही प्रतिक्रिया नव्हती. राहुल गांधी यांनी तरुणांनी घोषणा देणे मान्य केले मग हे तुम्हाला आता जड का जाते असा टोला तावडे यांनी लगावला

बोरीवलीमधील घटनेत कॉंग्रेसचे कार्यकर्ते राजेश निर्मल व अन्य कार्यकर्त्यांनी सामान्य प्रवाशांनाही मारहाण केल्याचे न्यूज चॅनेलच्या फूटेज मध्ये दिसत आहे. त्यांच्याविरुध्द कारवाई करण्यात यावी अशी आम्ही मागणी बोरिवली पोलिस ठाण्यातमध्ये केल्याचे विनोद तावडे यांनी सांगितले तसेच प्रचारासाठी ऊर्मिला मातोंडकर यांनी जितके पोलिस संरक्षण हवे आहे, तितके तुम्ही घ्या. आवश्यक असल्यास बाऊंसरही घ्या पण याच्या आधारे तुम्हाला मते मिळणार नाहीत असा टोलाही त्यांनी मारला.

राज ठाकरेंच्या भाषणाचा अहवाल निवडणूक आयोगाने मागवला. 
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे भाजपाकडून तक्रार करण्यात आली आहे. याबाबत निवडणूक आयुक्त कार्यालयाने नांदेडच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडून पूर्ण भाषणाचा अहवाल मागविला आहे. ते भाषण तपासून पाहण्यात येईल. राज ठाकरे यांच्या सर्व पुढील जाहीर सभांचे रेकॉर्डींग तपासून पाहण्यात येईल आणि त्यानुसार निर्णय घेण्यात येईल अशी माहिती विनोद तावडे यांनी दिली. 


Web Title: BJP leader Vinod Tawade questions to Urmila Matondkar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.