राज ठाकरेंबाबत 'पुतना मावशीचं प्रेम' दाखवू नका, प्रवीण दरेकरांचा संजय राऊतांना टोला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 11:37 IST2022-05-20T11:30:43+5:302022-05-20T11:37:42+5:30

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचा ५ जून रोजीचा नियोजित अयोध्या दौरा स्थगित करत असल्याची घोषणा केली आहे.

bjp leader Pravin Darekar reply to Sanjay Raut over raj thackeray ayodhya visit postponed | राज ठाकरेंबाबत 'पुतना मावशीचं प्रेम' दाखवू नका, प्रवीण दरेकरांचा संजय राऊतांना टोला!

राज ठाकरेंबाबत 'पुतना मावशीचं प्रेम' दाखवू नका, प्रवीण दरेकरांचा संजय राऊतांना टोला!

मुंबई-

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचा ५ जून रोजीचा नियोजित अयोध्या दौरा स्थगित करत असल्याची घोषणा केली आहे. याच मुद्द्यावरुन शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राज ठाकरेंना टोला लगावला. शिवसेनेचे देशात अनेक ठिकाणी मदत कक्ष आहेत. जर राज ठाकरेंनी अयोध्या दौऱ्याबाबत काही मदत मागितली असती तर आम्ही नक्कीच केली असती असं विधान संजय राऊत यांनी केलं. त्यावर आता भाजपाचे नेते आणि राज्याच्या विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज ठाकरे शिवसेनेत होते तेव्हा तुम्ही काय प्रेम दिलत ते सर्वांना माहित आहे. त्यामुळे संजय राऊतांनी राज ठाकरेंबाबत पुतना मावशीचं प्रेम दाखवू नये, असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे. 

'...तर राज ठाकरेंना आम्ही मदत केली असती', संजय राऊतांचं मोठं विधान!

राज ठाकरेंनी अयोध्या दौरा स्थगित करत असल्याचं ट्विट केल्यानंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत असताना त्यांनी राज ठाकरे आणि भाजपावर निशाणा साधला. याबाबत एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत असताना प्रवीण दरेकर यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं. "राज ठाकरे यांचा दौरा स्थगित झालेला आहे. रद्द झालेला नाही. त्यामुळे ते निश्चितच दौरा करतील. पुण्याच्या सभेत ते सविस्तर बोलणार आहेत असं त्यांनी म्हटलंय त्यामुळे त्यानंतरच आपल्याला त्यांची भूमिका कळेल. त्याआधी काही प्रतिक्रिया देणं योग्य नाही", असं प्रवीण दरेकर म्हणाले. 

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित, कारण काय? पुण्यातील सभेत सविस्तर बोलणार

भाजपाने राज ठाकरेंसोबत असं का करावं? असा सवाल उपस्थित करत संजय राऊत यांनी अयोध्या दौऱ्यावरुन टोला लगावला होता. त्यावरही प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिलं. "कोण कोणाचा वापर करुन घेतंय यावर संजय राऊतांनी बोलूच नये. ते आज राष्ट्रवादीचा भोंगा म्हणून उत्तम भूमिका वठवत आहेत हे महाराष्ट्र पाहातोय. शिवसेनेचा राष्ट्रवादी पक्ष कसा वापर करुन घेत आहे आणि शिवसेना कशी रसातळाला जात आहे हे निवडणुकीत, संघटनेत आणि जनतेच्या मनात दिसेल. राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून संजय राऊत काम करत आहेत", असं प्रवीण दरेकर म्हणाले. 

भाजपा-मनसेचं काय होईल ते यथावकाश कळेल
राज ठाकरे आणि भाजपाचं काय होईल हे यथावकाश कळेल. आधी तुमच्या पक्षाची काय दुर्दशा होतेय याकडे लक्ष द्या, असा खोचक टोला प्रवीण दरेकर यांनी संजय राऊतांना लगावला. "जनता काही मूर्ख नाही. संजय राऊतांचं शहाणपण अख्खा महाराष्ट्र पाहात आहे. महाविकास आघाडी सरकार बनत असताना राऊतांनी संपूर्ण शिवसेना शरद पवारांच्या पायाशी नेऊन ठेवण्याचं शहाणपण केलं आहे", असं प्रवीण दरेकर म्हणाले.

Web Title: bjp leader Pravin Darekar reply to Sanjay Raut over raj thackeray ayodhya visit postponed