"मी होते का तिथे? मग मी कसं एखाद्याचं नाव घेऊ?; कोण दोषी असेल त्याला शिक्षा करा"
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 17:07 IST2025-01-07T17:06:14+5:302025-01-07T17:07:09+5:30
एखाद्या कुटुंबाबाबत वाईट घटना घडल्यानंतर आपण त्यातून काहीतरी खाद्य मिळवण्याचा प्रयत्न करत असू तर ते चुकीचं आहे, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

"मी होते का तिथे? मग मी कसं एखाद्याचं नाव घेऊ?; कोण दोषी असेल त्याला शिक्षा करा"
BJP Pankaja Munde: "तपास यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि मला माहीत नाही ना यामध्ये कोण-कोण आरोपी आहेत. त्यामुळे मी कोणाचं कसं नाव घेऊ? कोणाचं नाव घेणं योग्य आहे का, हे तुम्ही मला सांगा. एखादी निर्घृण हत्या, एखादा पाशवी बलात्कार याला प्रत्यक्षदर्शी असेल तर तो हे होऊ देईल का? मी होते का तिथे? मग मी कसं एखाद्या व्यक्तीचं नाव घेऊन त्याच्यावर आरोप करणार. मी सांगतेय की, कोणीही असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे, त्याला कुठल्याही बाबतीत सूट मिळाली नाही पाहिजे," असं म्हणत भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर आपली भूमिका मांडली आहे. तसंच "मुख्यमंत्र्यांनी तपासाबाबत सकारात्मक उत्तर दिलं आहे. ही घटना घडली तेव्हा, त्याच्या दोन दिवस आधी आणि नंतरही राज्यभरात कितीतरी घटना घडल्या आहेत, त्याकडे कोणीतरी लक्ष देतंय का? संतोष देशमुख हा माझा कार्यकर्ता होता, त्याच्या मुलांच्या चेहऱ्याकडे बघून मला काय वाटतंय हे तुम्हाला सांगण्याची आणि त्याचं मोठं प्रदर्शन मांडण्याची आवश्यकता नाही. फक्त यातून काहीतरी वेगळं मिळवण्याचा प्रयत्न कोणीही करू नये," असं आवाहनही पंकजा मुंडे यांनी केलं आहे.
बीड हत्या प्रकरणावरून पंकजा मुंडे यांच्यावर शांत असल्याचा आरोप करणाऱ्या आमदार सुरेश धस यांना प्रत्युत्तर देताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, "संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करावी, अशी पहिली मागणी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन केली होती. माझ्या जिल्ह्यातील एका तरुणाची हत्या झाली. त्यावर मी व्यक्त न होण्याचं कारण काय आहे? मी वेळोवेळी यावर व्यक्त झाली आहे. या प्रकरणात कोणीही कितीही मोठा असला तरी त्याला पाठीशी घालणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या पटलावर सांगितलं आहे. मी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहे आणि माझे मुख्यमंत्री जेव्हा विधानसभेच्या पवित्र फ्लोअरवर सांगतात की, ज्यांनी निर्घृण हत्या केली त्यांना पकडू आणि शिक्षा करू, असं त्यांनी सांगितल्यानंतर मी पुन्हा मतं मांडणं योग्य नाही. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनावर आम्ही सकारात्मकता बाळगली पाहिजे, आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे," असं मत पंकजा यांनी व्यक्त केलं आहे.
संरपंच संतोष देशमुख यांच्या आरोपींना शिक्षा देण्याची मागणी करत निघत असलेल्या मोर्चांवरही पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका मांडली. " या विषयावर मोर्चात भाषण करून मुख्यमंत्र्यांवर अविश्वास व्यक्त करावा, असं मला वाटत नाही. या विषयाबाबत पूर्णपणे संवेदना माझ्या मनात आहेत. या विषयाला धरून इश्यू करावा, असा माझा स्वभाव नाही. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्यानंतरही आम्ही सतत प्रश्न निर्माण करत असू तर आम्ही आमच्या मुख्यमंत्र्यांवर संशय घेण्यासारखं होईल. यातील दोन-तीन आरोपी आता पकडले गेले आहेत. त्यामुळे या विषयात मी रोज-रोज भूमिका मांडणं योग्य नाही. या विषयाला रोज-रोज उगाळणं म्हणजे त्यांच्या दु:खाला उगाळण्यासारखं आहे. त्यांच्यावर झालेल्या दु:खाचा बाऊ करून आम्ही एक मंच तयार करतोय आणि त्यावर आम्ही आम्हाला व्यक्त करण्याचं साधन बनवतोय, असं वाटतं. निर्घृण फक्त हत्या नसते, निर्घृण आपला व्यवहारही असतो. एखाद्या कुटुंबाबाबत वाईट घटना घडल्यानंतर आपण त्यातून काहीतरी खाद्य मिळवण्याचा प्रयत्न करत असू तर ते चुकीचं आहे," असं पंकजा मुंडेंनी सुनावलं आहे.