Join us  

...त्यापेक्षा आम्ही काँग्रेस आणि पवारांची भांडी घासतोय सांगा; राऊत, आदित्य यांना राणेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2020 5:42 PM

'फ्री काश्मीर'चं पोस्टर धरल्याने सध्या हा पोस्टर राजकीय चर्चेचा विषय बनला आहे.

मुंबई: दिल्लीतील जेएनयू हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मुंबईतील गेट वे ऑफ इंडियावर विविध संघटनांकडून आंदोलन करण्यात येत होते. मात्र या आंदोलनादरम्यान एका तरुणीनं हातात 'फ्री काश्मीर'चं पोस्टर धरल्याने सध्या हा पोस्टर राजकीय चर्चेचा विषय बनला आहे. फ्री पोस्टरवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील एक व्हिडिओ ट्विट करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं होतं. मात्र फ्री काश्मीरचा अर्थ काश्मीरची निर्बंधांमधून मुक्तता करा असा आहे. तसेच काश्मीरमधील इंटरनेट, मोबाईल सेवा बंद करण्याच्या निर्बंधांमधून काश्मीरला मुक्त करा, अशी मागणी आंदोलक तरुणी पोस्टरद्वारे करत असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले होते. तसेच  मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील पोस्टर झळकवणाऱ्या मुलीचा उद्देश नेमका काय होता हे समजून घेणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं होतं. संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंच्या फ्री काश्मीरच्या पोस्टरबद्दलच्या विधानावरुन भाजपाचे नेते निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे. 

निलेश राणे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘Free Kashmir’ चा अर्थ शिवसेनेच्या संज्या राऊत आणि बारक्या आदित्यला ‘Free Internet’ वाटला. लोकांना मूर्ख समजता??? सरळ सांगून टाका सध्या आम्ही काँग्रेसवाल्यांची आणि पवारांची भांडी घासत आहोत म्हणून फ्री काश्मीरचा अर्थ आम्हाला विचारू नका. अख्या भारताला Free Kashmir चा अर्थ कळतो असं म्हणत संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी एएनआयचा व्हिडीओ रिट्विट करत उद्धव ठाकरेंना जाब विचारला होता. आंदोलन नेमके कशासाठी? काश्मीर मुक्तीची घोषणा कशाला? मुंबईमध्ये अशाप्रकारचे फुटीरतावादी खपवून का घ्यायचे? हे फक्त मुख्यमंत्री कार्यालयापासून दोन किमीवर घडतेय? उद्धव ठाकरे, तुमच्या नाकाखाली टिच्चून मुक्त काश्मीरचा भारतविरोधी राग आळवला जातोय, तो खपवून घेणार का, असा सवाल फडणवीस यांनी केला होता. यावर फ्री काश्मीरचा अर्थ संबंधित व्यक्तीनं सांगितल्याचं मी वर्तमानपत्रात वाचलं. फ्री काश्मीरचा अर्थ काश्मीरची निर्बंधांमधून मुक्तता करा असा होतो. काश्मीरमधील इंटरनेट, मोबाईल सेवा बंद आहे. तिथे आणखीही काही प्रकारचे निर्बंध लागू आहेत. त्या निर्बंधांतून काश्मीरला मुक्त करा, अशी मागणी आंदोलक तरुणी करत असल्याचं माझ्या वाचनात आलं आहे,' असं राऊत पुढे म्हणाले. काश्मीरला भारतापासून मुक्त करा, असं कोणी म्हणत असेल तर ते सहन करणार नाही, असा आक्रमक पवित्रादेखील संजय राऊत यांनी घेतला होता.

तसेच आदित्य ठाकरे यांनी फ्री काश्मीरचा पोस्टर झळकवण्याबाबत आंदोलन करणाऱ्या तरुणीचा उद्देश इंटरनेटवरील निर्बंध हटवायला पाहिजे असा आहे की अजून काही आहे हे समजून घेतलं पाहिजे. तसेच फ्री काश्मीरच्या पोस्टरद्वारे तरुणीला भारतापासून काश्मीर स्वातंत्र करा असं सांगायचे असेल तर हे चुकीचे असल्याचे देखील आदित्या ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

संजय राऊतांनी सांगितला 'फ्री काश्मीर'चा अर्थ; भाजपाला चोख प्रत्युत्तर

दरम्यान फ्री पोस्टरचा विषय चर्चेत आल्यानंतर पोस्टर झळकवणाऱ्या मेहक मिर्झा प्रभूने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत मी मंगळवारी 6 जानेवारी रोजी लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या प्रत्येकाप्रमाणे गेटवे ऑफ इंडियावर निषेध आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेली होती. त्यावेळी मला तिथे एक खाली पडलेलं पोस्टर सापडलं, ज्यावर स्वतंत्र काश्मीर लिहिण्यात आलं होतं. काश्मीरमध्ये इंटरनेट, मोबाइल सेवा सुरळीत व्हावी या एकमेव इच्छेखातर मी ते पोस्टर हातात घेतलं. तेथील लोकांना मुलभूत अधिकारांपासून वंचित ठेवलं जात आहे.'' म्हणून मी ते पोस्टर झळकावलं, असं मेहकने व्हिडिओद्वारे स्पष्ट केलं आहे. 

आंदोलनात FREE KASHMIR बोर्ड झळकावणाऱ्या मुलीनं दिलं स्पष्टीकरण

टॅग्स :उद्धव ठाकरेआदित्य ठाकरेसंजय राऊतजेएनयूमहाराष्ट्र सरकारनिलेश राणे भाजपाशिवसेनाभारतदेवेंद्र फडणवीस