Join us

...तर तुझी अवस्था साखर कारखान्यासारखी होईल; निलेश राणेंचा रोहित पवारांवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2020 09:35 IST

शरद पवार यांच्या एका पत्रावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार आणि भाजपाचे नेते निलेश राणे यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे.

मुंबई:  साखर उद्योगावरील आर्थिक संकटाला वाचा फोडणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या एका पत्रावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार आणि भाजपाचे नेते निलेश राणे यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. ट्विटरच्या माध्यमातून या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर निशाणा साधला आहे.

''साखर विषयावर किती पैसे महाराष्ट्रात खर्च झाले ह्यावर audit झालंच पाहिजे. साखर कारखाने करोडोंची उलाढाल करतात, राज्य सरकार, राज्य बँक, जिल्हा बँका सगळे साखर व्यवसायाला वर्षों वर्ष साथ देत आलेत. तरी वाचवा??', अशा आशयाचं ट्विट निलेश राणेंनी केलं होतं. यावर रोहित पवारांकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं.

''मी आपणास सांगू इच्छितो की शरद पवार यांनी साखर उद्योगासह 'कुक्कुटपालन' व इतर उद्योगातील दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठवून उपाययोजना सुचवल्या आहेत. साहेब प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडत असल्यानेच पंतप्रधान मोदीजीही त्यावर सकारात्मक विचार करतात. त्यामुळे काळजी नसावी'', असे ट्विट रोहित पवार यांनी केलं होतं. यावर आता पुन्हा निलेश राणे यांनी पलटवार केला आहे.

निलेश राणे ट्विटमध्ये म्हणाले आहे की, मी साखरेवर बोललो पवार साहेबांवर नाही. कुकुटपालनाची मागणी केली असेल तर तुझ्यासाठी चांगली आहे, तुला गरज आहे. साखरेवर बोलल्यावर मिरची का लागली, असा सवालही निलेश राणेंनी उपस्थित केला आहे. तसेच मतदार संघावर लक्ष दे सगळीकडे नाक टाकू नकोस, नाहीतर साखरकारखान्या सारखी हालत होईल तुझी अशी टीका देखील निलेश राणे यांनी रोहित पवारांवर केली आहे. त्यामुळे निलेश राणेंच्या या ट्विटनंतर हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, कोरोना महासंकटाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील अभूतपूर्व लॉकडाऊनने साखर उद्योगाला निर्माण झालेल्या संकटातून मुक्त करण्यासाठी आपण तातडीने हस्तक्षेप करत भरीव मदत करावी अशी विनंती करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे. यासंदर्भातील एका बातमीचा संदर्भ देत निलेश राणे यांनी पवारांना टार्गेट होतं. 

टॅग्स :रोहित पवारनिलेश राणे भाजपाराष्ट्रवादी काँग्रेसमहाराष्ट्र सरकार