Join us
Daily Top 2Weekly Top 5

'आत यांनीच टाकायचं अन् सुटल्यावर पेढेही यांनीच वाटायचे'; संजय राऊतांना निलेश राणेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 13:53 IST

कोरोनाचा वाढता धोका, लॉकडाउनमुळे उपासमारीची वेळ ओढावलेले हजारो मजूर विविध अफवांमुळे मंगळवारी दुपारी वांद्रे स्थानक परिसरात जमल्यानं तणाव निर्माण झाला होता.

मुंबई: विविध ठिकाणी अडकून पडलेल्या परप्रांतीय मजुरांसाठी प्रत्येक विभागातून विशेष गाड्या सोडण्यात येतील, असे चुकीचे वृत्त दिल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेले एबीपी माझा वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांना अटक करण्यात आली होती. मात्र गुरुवारी राहुल कुलकर्णी यांचा दंडाधिकारी न्यायालयाने जामीन मंजूर केला. राहुल कुलकर्णीला अटक झाल्यानंतर अनेक ज्येष्ठ पत्रकारांसह राज्यातील विविध नेत्यांनी देखील राहुल कुलकर्णी यांना पाठिंबा दर्शविला होता. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील राहुल कुलकर्णी यांना जामीन मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला होता. मात्र या सर्व प्रकरणावरुन भाजपाचे नेते निलेश राणे यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे.

वांद्र्यातील गर्दी प्रकरणात सर्वात मोठा गुन्हेगार कोण असेल तर रेल्वे मंत्रालय आहे, सोशल मीडियावर प्रक्षोभक पोस्ट लिहिल्या ते आहेत. रेल्वे मंत्रालयावरही महाराष्ट्र सरकारने किंवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली होती. तसेच संजय राऊत यांनी एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत राहुल कुलकर्णी यांना जामीन मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला होता. यावर राहुल कुलकर्णी यांना यांनीच अटक करायची आणि सुटल्यावर पेढे देखील वाटायचे असं म्हणत निलेश राणे यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे. 

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी नेण्यासाठी जनसाधारण स्पेशल ट्रेन्स सोडण्यात येणार असल्याचं वृत्त एबीपी माझानं दाखवलं होतं. दक्षिण मध्य रेल्वेनं काढलेल्या पत्राच्या आधारे वृत्त दिल्याचं राहुल कुलकर्णींनी वार्तांकन करताना म्हटलं होतं. याच वृत्तामुळे काल दुपारच्या सुमारास वांद्र्यात गर्दी झाल्याचा दावा करण्यात आला. यानंतर राहुल कुलकर्णी यांना उस्मानाबाद येथून पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. 

वांद्र्यात नेमकं काय घडलं?

कोरोनाचा वाढता धोका, लॉकडाउनमुळे उपासमारीची वेळ ओढावलेले हजारो मजूर विविध अफवांमुळे मंगळवारी दुपारी वांद्रे स्थानक परिसरात जमल्यानं तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिसांना तेथे अतिरिक्त कुमक मागवावी लागली. काही मजुरांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानं पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. दोन तासांनी ही गर्दी नियंत्रणात आली. या प्रकरणी सुमारे ८०० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :संजय राऊतनिलेश राणे भाजपाशिवसेनामहाराष्ट्र सरकारपोलिस