७/११तील सर्व दोषी निर्दोष, भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले, “CM फडणवीसांना...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 14:21 IST2025-07-21T14:20:04+5:302025-07-21T14:21:12+5:30
High Court Decision On 2006 Mumbai Train Blasts Case: मुंबई उच्च न्यायलायने दिलेला निकाल अतिशय धक्कादायक आहे. मुंबईकरांना न्याय मिळाला पाहिजे, असे भाजपा नेत्यांनी म्हटले आहे.

७/११तील सर्व दोषी निर्दोष, भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले, “CM फडणवीसांना...”
High Court Decision On 2006 Mumbai Train Blasts Case: मुंबईला हादरवून टाकणाऱ्या ११ जुलै २००६ च्या साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. मुंबई उच्च न्यायालायने दिलेल्या निर्णयामुळे राज्य सरकारला दणका बसला आहे. या प्रकरणी ७ जणांना जन्मठेप, तर ५ जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. १९ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर दोषींची निर्दोष मुक्तता झाली. मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालामुळे खळबळ उडाली असून, यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर आता भाजपा नेत्यांनी भाष्य केले आहे.
मुंबईत ११ जुलै २००६ रोजी संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास लोकलमध्ये एकूण ७ ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. माटुंगा, माहीम, बांद्रा, जोगेश्वरी, बोरीवली, कांदिवली, मीरारोड या रेल्वे स्थानकांदरम्यान स्फोट झाले होते. यात २०९ हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. तर ७०० पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. मुंबई लोकलमध्ये सायंकाळी गर्दी असते. त्यामुळे जास्तीत जास्त जीवितहानी होईल, याच हेतूने हे बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. तपासानंतर हे स्फोट लष्कर-ए-तैयबा आणि सिमी या दहशतवादी संघटनांनी घडवले, असा निष्कर्ष काढण्यात आला होता. उच्च न्यायालयाला जवळजवळ सर्वच सरकारी वकिलांचे युक्तिवाद अपूर्ण वाटले. तसेच दोषींविरोधात केवळ शंकेपलिकडे कोणतेही सबळ पुरावे तपास यंत्रणा सादर करू शकली नाही, असे महत्त्वाचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईतील नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे
२००६ मध्ये झालेल्या मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबई उच्च न्यायलायने दिलेला निकाल अतिशय धक्कादायक आहे. यामुळे खूप दुःख झाले आहे. २००६ मध्ये या प्रकरणातील तपास आणि न्यायालयीन लढाई यांमध्ये निश्चितच त्रुटी राहिलेल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे की, एक कायदेतज्ज्ञांचे पथक नेमावे आणि सर्वोच्च न्यायालयात या विरोधात याचिका करावी. मुंबईतील नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे. दहशतवाद्यांना शिक्षा झालीच पाहिजे, असे किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कमाल अन्सारी, मोहम्मद फैसल, अतौर रहमान शेख, एहतेशाम कुतुबुद्दीन सिद्दीकी, नवीद हुसेन खान आणि आसिफ खान या सर्वांना बॉम्ब ठेवल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले होते. या पाचही जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. यातील कमाल अन्सारीचा कोरोनाची लागण झाल्यामुळे नागपूर कारागृहात मृत्यू झाला होता. आता उर्वरित चार जण निर्दोष ठरवण्यात आले आहेत. जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या सात आरोपींमध्ये तनवीर अहमद अन्सारी, मोहम्मद माजिद शफी, शेख मोहम्मद अली आलम, मोहम्मद साजिद मार्गुब अन्सारी, मुझ्झम्मिल अतौर रहमान शेख, सुहेल मेहमूद शेख आणि जमीर अहमद लतीफुर रहमान शेख यांचा समावेश आहे. या सातही जणांना न्यायालयाने निर्दोष ठरवले आहे.