Join us  

संजय राऊत यांनीच मंत्र्याना सांगावे, 'हीच ती वेळ'; आशिष शेलार यांनी आभार मानत केली विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2020 2:20 PM

सामनाच्या या भूमिकेचे भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी स्वागत करत आभार देखील मानले आहे.

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याची घोषणा केली होती. मात्र अंतिमच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायची की नाही ते विद्यापीठ कायद्याच्या आधारे ठरवलं जाईल. परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेताना कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष करण्यात आलं आहे,' असं म्हणत राज्यपाल कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त केली होती. यावर आज शिवसनेचे मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून भूमिका मांडण्यात आली आहे.

राज्यपालांच्या सद्सद्विवेक बुद्धीवर आमचा विश्वास आहे, पण राजभवनाच्या दारावर काही चक्रम वादळे अधूनमधून आदळत असतात. राज्यपाल हे भले गृहस्थ आहेत. त्यांनी अशा चक्रम वादळांपासून सावध राहायला हवे. अन्यथा लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे, अशा शब्दांत अग्रलेखातून भूमिका मांडण्यात आली आहे. सामनाच्या या भूमिकेचे भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी स्वागत करत आभार देखील मानले आहे.

भाजपाचे नेते आशिष शेलार ट्विट करत म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या या "शैक्षणिक आरोग्याची" काळजी करणारी भूमिका आम्ही मांडली. संजय राऊत यांनी देखील ही विद्यार्थ्यांची काळजी अग्रलेखात अधोरेखित केली त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो, असं आशिष शेलार यांनी सांगितले. पंरतु उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत योग्य वेळी निर्णय घेऊ असे सांगत आहेत. त्यामुळे प्रश्न लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा असल्यामुळे संजय राऊत यांनीच मंत्र्यांना सांगावे की, निर्णय घेण्याची 'हीच ती वेळ' असं म्हणत आशिष शेलार यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

तत्पूर्वी, सरासरी गुण देण्याचा निर्णय सर्वसमावेशक विचार करुन झाला का? तरुणांच्या माथी "जळीत बीए" प्रमाणे "कोरोना ग्रॅज्युएट" बिरुदावली लागणार का? पदवी अंतिम वर्षे विद्यार्थ्यांच्या मनात अशा भयगंड निर्माण केलेल्या प्रश्नांकडे लक्ष वेधीत भाजपाचे नेते आणि माजी शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी  राजभवनवर जाऊन म्हणून राज्यपाल भगतसिंह कोशारी यांची भेट घेतली होती. शासनाने पदवी अंतीम वर्षांची परिक्षा न घेता सरासरी गुण देण्याचा व गुणसुधार कार्यक्रमात ऐच्छिक जाण्याचा तीन महिन्या नंतर त्यांची परिक्षा घेण्याचा जो निर्णय घेतला तो सर्वसमावेशक विचार करुन घेतला का असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :संजय राऊतआशीष शेलारभाजपाशिवसेनामहाराष्ट्र सरकारविद्यार्थी