Join us  

'...तेव्हा पर्यावरणप्रेम कुठे गेले होते?; शिवसेनेच्या हट्टापायी तीनशे कोटींचे नुकसान'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2020 5:00 AM

मुंबईकरांचे पावसात हाल, पूर परिस्थिती अशीच मागील पानावरून पुढील पानावर सुरू राहील.

मुंबई : मुंबई महापालिकेने पाच वर्षांत मुंबईतील तब्बल २५ हजार झाडे तोडण्यास परवानगी दिली तेव्हा पर्यावरणप्रेम कुठे गेले होते, असा प्रश्न विचारत मेट्रो कारशेडचे काम थांबविण्याच्या शिवसेनेच्या हट्टापायी मुंबईकरांचे तीनशे कोटींचे नुकसान झाल्याचा आरोप भाजप नेते, आमदार आशिष शेलार यांनी मंगळवारी केला.

पालिकेने गेल्या पाच वर्षांत मुंबईत विविध कारणांसाठी २५ हजार झाडे तोडण्याची परवानगी दिल्याचे अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले आहे. ही आकडेवारी समोर येताच शेलार यांनी सेनेवर निशाणा साधला. सेनेने विशेषत: युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणाचा मुद्दा पुढे करत आरे मेट्रो कारशेडला विरोध केला. यावरून सेना, भाजप आमनेसामने आले होते. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर कारशेडच्या कामाला स्थगिती दिली. याचा संदर्भ घेत शेलार यांनी सेनेच्या पर्यावरणप्रेमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

मुंबईतील २५ हजार झाडे कापली जात असताना पर्यावरणाची आठवण आली नाही का, असा सवाल त्यांनी केला. पालिकेच्या अर्थसंकल्पाचा आकार घटवला असला तरी कराचा बोजा वाढविला.मलनि:सारण, जल, कचरा संकलनाचा कर छुप्या पद्धतीने वाढवल्याचा आरोप त्यांनी केला. मुंबईला २०३० पर्यंत आपत्तीमुक्त करण्यासाठी केवळ पाच कोटींची तरतूद आहे. त्यामुळे आपत्तीमुक्तीचा दावा दावा पोकळ आहे.

मुंबईकरांचे पावसात हाल, पूर परिस्थिती अशीच मागील पानावरून पुढील पानावर सुरू राहील. सत्ताधारी शिवसेनेने मुंबई पालिकेला धोक्याच्या आर्थिक स्थितीवर ‘आणून दाखवले’ आहे. पालिकेचे उत्पन्न घटल्याने राखीव निधीमधून ४३८० कोटींची उचल घ्यावी लागली. भविष्यात पालिकेचे फिक्स डिपॉजिटही मोडावे लागणार का, असा प्रश्नही शेलार यांनी उपस्थित केला.

टॅग्स :उद्धव ठाकरेआशीष शेलारआदित्य ठाकरेमुंबई महानगरपालिकामुंबईपर्यावरणमहाराष्ट्र सरकारभाजपाशिवसेना