Join us

“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 14:42 IST

जितेंद्र आव्हाडांना पुढे करून सनातनी दहशतवादाचा नवा फेक नॅरेटिव्ह पुढे आणण्याचा काँग्रेस व शरद पवार गटाचा कट आहे. उद्धव ठाकरेंना हे मान्य आहे का, अशी विचारणा भाजपाने केली आहे.

मुंबई: भगवा दहशतवादाच्या फेक नॅरेटिव्हचा कट कोर्टानेच उधळून लावल्यानंतर आता काँग्रेसी संस्कृतीने सनातन हिंदू धर्माच्या नावाने पुन्हा सुरू केलेला अपप्रचार म्हणजे महात्मा गांधींचा वारसा स्वतःच्या हाताने पुसून टाकण्याची तयारी असून, हिंदुत्वाचे मुखवटे धारण केलेल्या काँग्रेसच्या ताटाखालच्या मांजरांनी सनातन धर्मास दहशतवादी ठरविण्याच्या कटात सहभागी होऊन आपलाही मुखवटा उतरविल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी टीका प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकारांशी बोलताना केली. 

पत्रकार परिषदेत बोलताना केशव उपाध्ये बोलत होते. हिंदूंना बदनाम करण्याच्या जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपांशी हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे उद्धव ठाकरे सहमत आहेत का, असा सवाल केशव उपाध्ये यांनी यावेळी केला. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष मुक्तता झालेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना दोषी ठरवून भगवा आतंकवाद सिद्ध करण्याचा काँग्रेस नेत्यांचा व शरद पवार यांचा कट न्यायालयाने उधळून लावल्याने आता आमदार जितेंद्र आव्हाड नावाच्या आमदारास पुढे करून सनातनी दहशतवादाचा नवा फेक नॅरेटिव्ह पुढे आणण्याचा काँग्रेस व शरद पवार गटाचा कट आहे, असा आरोप केशव उपाध्ये यांनी केला. 

सनातन धर्म ही भारताच्या प्राचीन सहिष्णु समाजव्यवस्थेची परंपरा

सनातन धर्म ही भारताच्या प्राचीन सहिष्णु समाजव्यवस्थेची परंपरा आहे. महात्मा गांधी यांनी या परंपरेचे पालन करून सनातन धर्माचे आचरण केले होते, याचा काँग्रेसच्या लांगूलचालनवादी राजकारणास विसर पडला आहे. सनातन ही देशाची संस्कृती आहे आणि या संस्कृतीने भारताच्या समाजव्यवस्थेला सहिष्णुतेचे संस्कार दिले आहेत, असे सांगत केशव उपाध्ये यांनी यंग इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या महात्मा गांधी यांच्या लेखाचा पुरावाच सादर केला. मी स्वतःस सनातनी हिंदू मानतो व वेद, उपनिषदे, पुराण आणि संपूर्ण हिंदू शास्त्रांवर माझा दृढ विश्वास आहे, असे महात्मा गांधी यांनी या लेखात नमूद केले आहे, असे केशव उपाध्ये म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी आता आव्हाड यांच्यासमोरही गुडघे टेकले

ऊठसूठ हिंदुत्वाचा बेगडी मुखवटा जनतेसमोर दाखवून हिंदुत्वाचा अभिमान असल्याचा दावा करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आता आव्हाड यांच्यासमोरही गुडघे टेकले असून काँग्रेसी संस्कृतीस शरण गेलेले ठाकरे आता मूग गिळून गप्प का, आव्हाडांची सनातन संस्कृतीवरील टीका त्यांना मान्य आहे का, असा सवाल उपाध्ये यांनी केला. सनातन संस्कृतीच्या विरोधात गरळ ओकून अल्पसंख्याकांच्या भावना कुरवाळण्याचे काँग्रेस व शरद पवार गटाचे राजकारण सपशेल फसले असताना पुन्हा एकदा हिंदुविरोधाची मळमळ आव्हाडांच्या मुखातून ओकून टाकण्याचा काँग्रेसी संस्कृतीचा आणि त्यास शरण गेलेल्या उद्धव ठाकरे यांचा आम्ही तीव्र निषेध करतो, असेही केशव उपाध्ये म्हणाले. 

दरम्यान, कोणतेही पुरावे न देता एका घटनेसंदर्भात पोलिसांवर अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्याचा आग्रह धरत शरद पवार गटाच्या रोहित पवार यांनी पोलीस आयुक्तालयात झुंडशाही करत पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. रोहित पवार यांची ही झुंडशाही लोकशाहीसाठी अत्यंत घातक असून ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ही झुंडशाही मान्य आहे का, अशी विचारणा केशव उपाध्ये यांनी केली.

 

टॅग्स :भाजपाशिवसेनाउद्धव ठाकरेजितेंद्र आव्हाडराष्ट्रवादी काँग्रेस