Join us  

सत्तेसाठी मन की बात; पाहा भाजपानं राज ठाकरेंवर कसा केला पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2018 6:18 PM

राज ठाकरेंच्या व्यंगचित्राला भाजपाचं व्यंगचित्रातून प्रत्युत्तर

मुंबई: भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर व्यंगचित्रातून निशाणा साधणाऱ्या मनसेप्रमुख राज ठाकरेंना भाजपानं व्यंगचित्रातूनच प्रत्युत्तर दिलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सत्तेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी जवळीक साधत असल्याचा टोला या व्यंगचित्रातून लगावण्यात आला. शरद पवार आणि राज ठाकरे एकमेकांच्या पाठीत खंजीर खुपसत असल्याचं यातून दाखवण्यात आलं आहे. मातोश्रीवरील अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या बहुचर्चित भेटीवर राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून निशाणा साधला होता. उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांची गळाभेट राज यांनी व्यंगचित्रात दाखवली होती. हे दोन्ही नेते एकमेकांच्या पाठीत खंजीर खुपसण्याच्या तयारीत असल्याचं व्यंगचित्र राज यांनी रेखाटलं होतं. राज यांच्या या व्यंगचित्राला आता भाजपानं प्रत्युत्तर दिलं आहे. 'सत्तेसाठी मन की बात' या शीर्षकाखाली भाजपाकडून एक व्यंगचित्र व्हायरल करण्यात आलं आहे. यामध्ये शरद पवार आणि राज ठाकरे गळाभेट घेत असून ते एकमेकांच्या पाठीत खंजीर खुपसण्याच्या तयारीत असल्याचं या व्यंगचित्रात दाखवण्यात आलं आहे. राज यांनी त्यांच्या व्यंगचित्रात उद्धव ठाकरेंच्या खिशात राजीनामा दाखवला होता. उद्धव ठाकरेंकडून वारंवार दिल्या जाणाऱ्या राजीनाम्याची धमकीची राज यांनी खिल्ली उडवली होती. आता भाजपानं व्हायरल केलेल्या व्यंगचित्रात राज यांच्या खिशात ब्लू प्रिंट दाखवण्यात आली आहे.

याआधीही भाजपानं राज ठाकरेंच्या व्यंगचित्रातून त्यांच्यावर निशाणा साधला होता. राज यांनी भाजपा अध्यक्ष अमित शहांच्या संपर्क फॉर समर्थनवर निशाणा साधला होता. अमित शहांची बकेट लिस्ट या शीर्षकाखाली रेखाटलेल्या या व्यंगचित्रात अमित शहा एक यादी पाहताना दाखवण्यात आले होते. या यादीत ज्या प्रसिद्ध व्यक्तींची भेट घ्यायची, त्यांची नावं होती. भाजपा अध्यक्ष प्रसिद्ध लोकांच्या भेटी घेत असताना, सामान्य कार्यकर्त्यांकडे त्यांचं दुर्लक्ष झाल्याचं राज यांनी व्यंगचित्रातून दाखवलं होतं. या व्यंगचित्रालादेखील भाजपानं व्यंगचित्रातून प्रत्युत्तर दिलं होतं.  

टॅग्स :राज ठाकरेशरद पवारभाजपामनसेराष्ट्रवादी काँग्रेसअमित शाहउद्धव ठाकरेशिवसेना