"मुंबईचे मारेकरी कोण? राजकीय स्वार्थासाठी मराठी माणसाला वापरले"; भाजपाचा ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 15:11 IST2025-12-16T15:09:30+5:302025-12-16T15:11:56+5:30
भाजपाने ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे.

"मुंबईचे मारेकरी कोण? राजकीय स्वार्थासाठी मराठी माणसाला वापरले"; भाजपाचा ठाकरेंना टोला
निवडणुकीची घोषणा होताच ठाकरे बंधूविरोधात मुंबईमध्ये बॅनर्स लावण्यात आले आहेत. हे बॅनर्स कुणी लावले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानेच ठाकरे बंधुंना लक्ष्य करण्यात आले आहे. दक्षिण मुंबईत ठाकरेंविरोधात बॅनर्स लावले गेले असून, त्यावर हिंदुत्व, घराणेशाही आणि मुंबई महापालिकेची सत्ता या तीन मुद्द्यांवर बोट ठेवण्यात आलं आहे.
दक्षिण मुंबईमध्ये अनेक ठिकाणी लावण्यात आलेल्या बॅनर्सवर "जे हिंदुत्वाचे नाही झाले, ते मराठी माणसांचे काय होणार! मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या नांदी लागू नको" असं म्हटलं आहे. याच दरम्यान भाजपाने ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. "मुंबईचे मारेकरी कोण? मराठी माणसाला कळून चुकलेय. डोळे मिटून यांनी पालिकेत २५ वर्षे खाल्ले, राजकीय स्वार्थासाठी मराठी माणसाला वापरले" असं म्हणत निशाणा साधला आहे.
मराठी माणसाने शुभ मुहूर्त काढला !!
\— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 16, 2025
मुंबईचे मारेकरी कोण?
मराठी माणसाला आता कळून चूकलेय
त्याने मुंबईला वाचवायचेय स्वतःच ठरवून ठेवलेय!
डोळे मिटून यांनी पालिकेत 25 वर्षे खा.. खा.. खाल्ले
राजकीय स्वार्थासाठी
मराठी माणसाला वापरले
आता यांना मराठी माणूस आठवतोय
जागा हो... म्हणून…
भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्वीट केलं आहे. "मराठी माणसाने शुभ मुहूर्त काढला!! मुंबईचे मारेकरी कोण? मराठी माणसाला आता कळून चुकलेय. त्याने मुंबईला वाचवायचेय स्वतःच ठरवून ठेवलेय! डोळे मिटून यांनी पालिकेत २५ वर्षे खा.. खा.. खाल्ले, राजकीय स्वार्थासाठी मराठी माणसाला वापरले. आता यांना मराठी माणूस आठवतोय."
"जागा हो... म्हणून होर्डिंग लावून कोण तरी मराठी माणसाला उठवतोय! तो तर जागाच आहे.. उघड्या डोळ्याने बघतो, अरे लबाड बोक्यांनो तुम्हाला हरवण्याची संधी शोधतोय. आता तारीख ठरली...वार ही ठरला. मराठी माणसाने तुम्हाला हरवण्याचा शुभ मुहूर्त काढला!!" असं ट्वीटमध्ये म्हटलं आहे. मुंबईमध्ये लावलेल्या बॅनर्सवरून अप्रत्यक्षपणे हिंदू-मुस्लीम मुद्द्यांचाही उल्लेख केला गेला आहे. "मुंबईचा रंग बदलू देऊ नको", असंही म्हटलं गेलं आहे. त्याचबरोबर "बृहन्मुंबई महापालिका हा काही कौटुंबिक व्यवसाय नाहीये", असं म्हणत ठाकरेंवर निशाणा साधण्यात आला आहे.