Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजन प्लांटची उभारणी दुप्पट दरात, भाजपचा आरोप; चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 10:04 IST

कोरोनाच्या दुसऱ्यात लाटेत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत गेली. या काळात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता.

मुंबई : जुलै महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने महापालिकेची तयारी सुरू आहे. यावेळेस ऑक्सिजनचा तुटवडा होऊ नये, यासाठी १२ रुग्णालयांमध्ये १६ ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहेत. मात्र, यासाठी मागविलेल्या निविदा दुप्पट दराने असल्याने यामध्ये घोटाळा असल्याचा आरोप भाजपने केला आहे. तसेच याची चौकशी करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.कोरोनाच्या दुसऱ्यात लाटेत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत गेली. या काळात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे ऑक्सिजन साठा संपल्यावर संबंधित रुग्णालयातून रुग्णांना तातडीने अन्य रुग्णालयात दाखल करावे लागत होते. मुंबईतील ऑक्सिजनची दररोजची मागणी २७५ मेट्रिक टनावर पोहोचली. सध्या परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महापालिकेचे नियोजन सुरू आहे. ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सर्व पातळ्यांवर स्थानिक प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. वसई - विरार महापालिकेनेही निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. यातील टेक्नोमेट निविदाकाराचा दर मुंबईतील निविदा प्रक्रियेतील दरांच्या तुलनेत कमी आहे. त्याच ऑक्सिजन प्लांट उभारणी प्रकल्पाकरिता मुंबई महापालिका प्रशासनाने दुप्पट खर्च करीत आहे. ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी महापालिकेने काढलेल्या निविदेमध्ये पारदर्शकता नाही, असा आरोप भाजपचे नेते विनोद मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

‘ऑक्सिजन प्लांटच्या दरात घोटाळा नाही’- भाजपने केलेल्या आरोपांचे पालिका प्रशासनाने खंडन केले आहे. महापालिकेचे दोन ऑक्सिजन प्लांट सध्या कार्यरत असून आणखी १२ ठिकाणी महापालिकेद्वारे ऑक्सिजन प्लांटची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक निविदा प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने, स्पर्धात्मकरित्या व नियमानुसारच राबविण्यात आली आहे. - ऑक्सिजन प्लांट किंवा इतर यंत्र प्रणालीचे दर व एकंदर खर्च हे त्याची निर्मिती क्षमता, निर्मिती करण्याच्या प्रकार, तांत्रिक बाबी, कामाची व्याप्ती व प्रमाण, अधिदानाच्या‌ व अटी व शर्ती, पुरवठा कालावधी इत्यादी बाबींवर अवलंबून ‌असतो. - त्यामुळे तौलानिक अभ्यास करताना या बाबी लक्षात घेणे, अत्यंत गरजेचे आहे. महापालिकेद्वारे १२ ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजन प्लांटची एकूण क्षमता ही ४५ मेट्रिक टन प्रतिदिन एवढी आहे.  

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याभाजपाशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसऑक्सिजनहॉस्पिटलडॉक्टरकोरोनाची लस