निवडणूक काळात रात्री १० नंतर भोंगा बंद; निवडणूक आयोगाचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 13:15 IST2024-04-10T13:15:07+5:302024-04-10T13:15:18+5:30
लोकसभेच्या पार्श्वभूमिवर केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश

निवडणूक काळात रात्री १० नंतर भोंगा बंद; निवडणूक आयोगाचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर केंद्रीय निवडणूक आयोगाने रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत लाऊडस्पीकर, भोंग्यांच्या वापरावर मनाई केली आहे. अन्यथा सामुग्री जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे. नेते व त्यांचे कार्यकर्ते प्रचारासाठी गल्लोगली पायपीट करत आहेत. नेत्याचा ‘आवाज’ जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी कानठळ्या बसतील, अशा आवाजात लाऊडस्पीकर लावण्यात येतो. प्रचारात सामान्यांची झोपमोड होऊ नये व पर्यावरणाला हानी पोहचू नये, यासाठी आदेश काढला आहे.
ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई
प्रचारासाठी रात्री-बेरात्री लाऊडस्पीकर लावून सामान्यांना त्रास देतात. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक प्रचारादरम्यान लाऊडस्पीकरच्या वापराबाबत नियम घातले आहेत. या नियमांचा नेते, त्यांचे कार्यकर्ते भंग करतात की नाही, ही पाहण्याची जबाबदारी राज्य सरकार व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळावर सोपविण्यात आली आहे.
वाहनात स्पीकर बसवून प्रचार करण्यात येणार असेल, तर त्याची नोंद संबंधित प्राधिकरणाकडे करणे बंधनकारक आहे. तशी नोंद केली नसल्यास संबंधित वाहन आणि स्पीकर जप्त करण्यात येईल. ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले तर एमपीसीबी नियमानुसार कारवाई करण्यास मोकळी आहे.