आघाडीबाबत भाई जगताप यांच्या विधानामुळे मविआत फटाके, नंतर स्पष्टीकरण देत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 16:18 IST2025-10-22T16:17:55+5:302025-10-22T16:18:38+5:30
Bhai Jagtap News: काही महिन्यांवर आलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार भाई जगताप यांनी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेबाबत केलेल्या विधानामुळे ऐन दिवाळीत महाविकास आघाडीमध्ये वादाचे फटाके फुटले आहेत.

आघाडीबाबत भाई जगताप यांच्या विधानामुळे मविआत फटाके, नंतर स्पष्टीकरण देत म्हणाले...
काही महिन्यांवर आलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार भाई जगताप यांनी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेबाबत केलेल्या विधानामुळे ऐन दिवाळीत महाविकास आघाडीमध्ये वादाचे फटाके फुटले आहेत. आम्ही राज ठाकरेच काय, उद्धव ठाकरे यांच्यासोबतही आघाडी करणार नाही असं विधान भाई जगताप यांनी केलं होतं. त्यामुळे आज मुंहईतील राजकारण तापलं. मात्र नंतर काँग्रेसने हे त्यांचं वैयक्तिक मत असल्याचं सांगत वाद टाळला. तर भाई जगताप यांनीही आपल्या विधानावर स्पष्टीकरण देत मी पक्षाचा प्रमुख नसल्याने हे माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे त्यावरून विनाकारण गुगल्या टाकू नयेत, असे म्हटले आहे.
आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे पक्ष एकत्र लढवणार हे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र त्यामुळे काँग्रेस राज ठाकरे यांच्या मनसेला महाविकास आघाडीमध्ये सामावून घेणार का? राज ठाकरे हे वैचारिक मतभिन्नता बाजूला ठेवून काँग्रेसशी जुळवून घेतील का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी मुंबई प्रदेशाध्यक्ष असलेल्या भाई जगताप यांनी आज एक मोठं विधान केलं. ते म्हणाले की, राज ठाकरेच काय आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबतही आघाडी करून लढणार नाही. मी मुंबई काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष असताना हीच बाब ठामपणे सांगितली होती. नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या पॉलिटिकल वर्किंग कमिटीच्या बैठकीतही मी माझं हे म्हणणं मांडलं. तेव्हा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला हेसुद्धा तिथे उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. त्यांचीही लढण्याची इच्छा असते. त्यामुळे कार्यकर्त्यांना लढू द्या. म्हणून आम्ही मुंबईत स्वबळावर लढूया, असे मी सांगितले.
दरम्यान, भाई जगताप यांच्या या विधानावरून राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर आपल्या विधानावर स्पष्टीकरण देताना भाई जगताप म्हणाले की, गेल्या आठवड्यात झालेल्या काँग्रेसच्या पॉलिटिकल वर्किंग कमिटीच्या बैठकीमध्ये मी माझं मत मांडलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या स्वबळावर लढवायला हव्यात, असं मी सांगितलं. तिथे उपस्थित असलेल्या अनेक नेत्यांनीही तेच मत मांडलं. मात्र मी काही पक्षाचा अध्यक्ष नसल्याने हे माझं वैयक्तिक मत आहे. त्यावरून विनाकारण तर्कवितर्क लढवू नयेत, असेही जगताप यांनी सांगितले.