Best Employees Cooperative Credit Society Election 2025 Result: मुंबईतील बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे गट-मनसे यांच्या ‘उत्कर्ष पॅनेल’चा दारुण पराभव झाला. या निवडणुकीत शशांक राव पॅनेलने सर्वाधिक १४ जागा जिंकून मोठे यश मिळवले. महायुती प्रणित सहकार समृद्धी पॅनेलने ७ जागांवर विजय मिळवला. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे बेस्टची निवडणूक अधिक चर्चेत होती. ठाकरे गटाला शह देण्यासाठी भाजपा नेत्यांनीही पॅनल उतरवले होते. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. परंतु, या निवडणुकीत गाजावाजा न करता शशांक राव यांनी बाजी मारली आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
बेस्टमध्ये जुनी माणसे बदलणे, नवीन लोक देणे, संघटनेच्या कर्मचाऱ्यांच्या कामांचा नियमित आढावा घेणे, याबाबत उद्धव ठाकरे यांचे धोरण उदासीन दिसले. यामुळेच बेस्टमध्ये ठाकरे गटाला उतरती कळा लागली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शशांक राव यांच्या पॅनेलने सर्वांचे अंदाज चुकवले. शशांक राव हे कामगार संघटनेचे नेते शरद राव यांचे पुत्र आहेत. शशांक राव यांचे वडील शरद राव हे कामगार नेते होते. मुंबई महानगरपालिकेत २५ वर्षे शिवसेना-भाजपाची सत्ता असताना, बाळासाहेब ठाकरे व गोपीनाथ मुंडे हयात असतानाही पालिकेच्या अंतर्गत कामगार संघटनेत शरद राव यांचे वर्चस्व कायम राहिले.
ठाकरे बंधूंना चितपट करणारे शशांक राव कोण आहेत?
शशांक राव हे गेल्या अनेक वर्षांपासून कामगार संघटनांसोबत सक्रिय असून कामगारांच्या अनेक आंदोलनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. शशांक राव यांनी त्यांच्या वडिलांप्रमाणे कामगार संघटनांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामे केली. त्यांनी बेस्टमध्ये अनेक आंदोलनं केली. त्यामुळे बेस्टचा कर्मचारी वर्ग त्यांच्यासोबत राहिला. शशांक राव भाजपमध्ये असले तरी त्यांनी या निवडणुकीत स्वत:चे स्वतंत्र पॅनेल उभे केले होते.
बेस्ट वर्कर्स युनियनचे प्रमुख
आजवर अनेक आंदोलनं आणि बेस्ट कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात त्यांनी वेळोवेळी घेतलेला पुढाकार हे त्यांच्या नेतृत्वाचं आणि आजचा विजयाचे फलित मानलं जातंय. शशांक राव हे मुंबई ऑटो रिक्षा युनियन आणि शहरातील बेस्ट वर्कर्स युनियनचे प्रमुख आहेत. ८ वर्षांपूर्वी शशांक राव यांनी त्यांच्या पदार्पणातच मोठ्या ऑटो रिक्षा युनियनच्या संपाचे नेतृत्व करत ते यशस्वी केले होते. शरद राव यांच्या नेतृत्वात तयार झालेल्या शशांक राव यांनी बेस्ट, बीएमसी, हॉकर्स, ऑटो आणि टॅक्सी ड्रायव्हर्स युनियनच्या कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या संपात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. लोकसभा निवडणुकीपूर्वी शशांक राव यांनी जनता दल युनाइटेडचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा देत भाजपामध्ये प्रवेश केला होता.
दरम्यान, शशांक राव यांच्या पॅनेलच्या विजयात गेल्या अनेक वर्षांपासून कामगार संघटनांसोबत काम करण्याचा अनुभव, आंदोलने आणि बेस्ट कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात वेळोवेळी घेतलेला पुढाकार, असे अनेक घटक महत्त्वाचे ठरल्याचे सांगितले जाते. या सगळ्यामुळे बेस्ट पतपेढीच्या तब्बल १५ हजार मतदारांनी ठाकरे बंधू आणि महायुती दोघांनाही नाकारत शशांक राव पॅनेलच्या पारड्यात दान टाकल्याची चर्चा आहे.