भांडुपमध्ये बेस्ट इलेक्ट्रिक बसने घेतला चौघांचा बळी; दहा जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 06:47 IST2025-12-30T06:45:41+5:302025-12-30T06:47:04+5:30
भांडुप पश्चिमेला रात्री १०च्या सुमारास घडलेल्या या भीषण दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला, तर १० जण जखमी झाले. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. काही जखमींची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली.

भांडुपमध्ये बेस्ट इलेक्ट्रिक बसने घेतला चौघांचा बळी; दहा जखमी
मुंबई : नऊ जणांचा जीव घेणाऱ्या कुर्ल्यातील बस दुर्घटनेच्या जखमा अद्याप भरल्या नसताना सोमवारी रात्री पुन्हा एकदा बेस्टच्या भाडेतत्वावरील इलेक्ट्रिक बसने १३ निरपराध नागरिकांना चिरडले. भांडुप पश्चिमेला रात्री १०च्या सुमारास घडलेल्या या भीषण दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला, तर १० जण जखमी झाले. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. काही जखमींची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली.
भांडुप पश्चिम स्टेशन रोड या गजबजलेल्या परिसरात बेस्टची आकाराने मोठी असलेली इलेक्ट्रिक बस मागे घेताना चालकाचा ताबा सुटला आणि बसखाली १३ जण चिरडले. त्यांपैकी चौघांचा जागीच मृत्यू झाला. “या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून १० जणांवर उपचार सुरू आहेत”, असे पोलिस उपायुक्त हेमराजसिंह राजपूत यांनी सांगितले. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.
कुर्ला अपघाताच्या आठवणी ताज्या
गेल्या वर्षी ९ डिसेंबर रोजी कुर्ला परिसरात इलेक्ट्रिक बसवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात ९ जणांचा बळी गेला होता आणि ३७ जण जखमी झाले होते. या भीषण दुर्घटनेची ही पुनरावृत्तीच आहे.
फेरिवाल्यांचे बस्तान
भांडूप स्टेशन लगतच बेस्ट बसचा डेपो आहे. आधीच अरुंद त्यात अवैध फेरीवाले आणि भाजी विक्रेत्यांमुळे आक्रसून गेलेल्या स्टेशन रोड डेपोतून लालबहादूर शास्त्री मार्गाकडे येणारा या रस्त्यावरून बस चालविताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. या बस डेपोचा मुद्दा वर्षानुवर्षे रखडला आहे.
नागरिकांना चालण्यास रस्ताच नाही...
स्टेशन रोड येथून बस कशाबशा डेपोपर्यंत ये-जा करतात. त्यात सायंकाळी गर्दीच्या वेळी प्रवाशांना जीव मुठीत धरून वाट काढावी लागते. काही दिवसांपूर्वी या डेपोतून बेस्टची वातानुकूलित बस सेवा सुरू झाल्याने कोंडीत भर पडत आहे. रुंद आणि लांब असलेल्या या बसमुळे रस्त्यावर पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागाच उरत नाही. तसेच या बस आकाराने मोठ्या असल्याने डेपोतून वळवताना चालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.