"चालक घाबरला अन् त्याने..."; कुर्ल्यातील भीषण बस अपघाताचे कारण आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 08:27 IST2024-12-10T08:19:38+5:302024-12-10T08:27:07+5:30
कुर्ला येथे झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून ३६ जण जखमी आहेत.

"चालक घाबरला अन् त्याने..."; कुर्ल्यातील भीषण बस अपघाताचे कारण आलं समोर
Kurla BEST Bus Accident : मुंबईच्या कुर्ला परिसरात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. सोमवारी रात्री भरधाव बेस्टच्या बसने अनेकांना धडक दिली आहे. या अपघातामध्ये ३५ जण जखमी झाले असून ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात जखमी झालेल्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर बसच्या चालकाला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. नियंत्रण सुटलेल्या बसने अनेक पादचाऱ्यांबरोबरच वाहनांनाही धडक दिली. या भीषण अपघाताबाबत शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
कुर्ला परिसरात सोमवारी रात्री १०.४५ च्या सुमारास मोठा अपघात झाला. बेस्टच्या ३३२ क्रमांकाच्या बसने नियंत्रण सुटून रस्त्यावरील अनेक वाहने आणि सुमारे ३५ जणांना चिरडले. एका सोसायटीची भिंत तोडून नियंत्रणाबाहेर गेलेली बस शेवटी थांबली. या भीषण अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला, तर ३५ जण जखमी झाले. नियंत्रणाबाहेर गेलेल्या बेस्ट बसने अनेक वाहनांचेही नुकसान केले आहे. पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी बस चालकाने ब्रेकऐवजी ॲक्सिलेटर दाबल्यामुळे हा अपघात घडल्याचे म्हटलं आहे.
या भीषण घटनेनंतर आमदार दिलीप लांडे हे घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अपघाताची माहिती घेतली. "कुर्ला स्टेशनवरून निघालेल्या बसचा ब्रेक निकामी झाला आणि चालकाचा बसवरील ताबा सुटला. चालक घाबरला आणि त्याने ब्रेक दाबण्याऐवजी एक्सलेटर दाबला ज्यामुळे गाडीचा वेग आणखी वाढला. त्यामुळे बस अनियंत्रित झाली. त्यामुळे बसन ३०-३५ लोकांना धडक दिली. यातील ४ लोकांची प्रकृती गंभीर आहे," अशी माहिती दिलीप लांडे यांनी दिली.
#WATCH | Dilip Lande, Shiv Sena MLA says, " A bus which left from Kurla Station, its brake got failed and the driver lost the control of the bus. Driver got scared and instead of pressing the brake, he pressed the accelerator and the speed of the bus increased. He couldn't… https://t.co/aYuqFfk6Kspic.twitter.com/wLu8iqXsJX
— ANI (@ANI) December 9, 2024
पोलिसांनी बस चालक संजय मोरे (५०) याला ताब्यात घेतले आहे. संजय मोरेने दावा केला आहे की ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाला. मात्र, बस चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने बसवर नियंत्रण ठेवू शकला नाही, असा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. राज्य परिवहन विभागाचे निरीक्षक भरत जाधव यांनी सांगितले की, प्रथमदर्शनी बसचे ब्रेक ठीक आहेत. याबाबत सविस्तर चौकशी करण्यात येईल.