"कारवाई करताना जनतेशी सौजन्याने वागा"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 01:42 AM2021-04-07T01:42:57+5:302021-04-07T01:43:27+5:30

पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना

Be polite to the public while taking action | "कारवाई करताना जनतेशी सौजन्याने वागा"

"कारवाई करताना जनतेशी सौजन्याने वागा"

googlenewsNext

मुंबई :  कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करताना जनतेशी सौजन्याने वागण्याच्या सूचना पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिल्या आहेत. मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून त्यांनी पोलिसांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. 
यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना नगराळे यांनी पोलिसांना  नियमावलीबाबत सविस्तर माहिती देऊन काय करावे व काय करू नये, याबाबत सांगितले. अत्यावश्यक सेवेसाठी यापूर्वी दिलेले पास या काळातही वैध राहील. नव्याने पाससाठी आता सहायक पोलीस आयुक्तांकडे अर्ज करता येईल. यापूर्वी पोलीस उपायुक्तांंकडे याचे अधिकार होते. दिलेल्या पाससंदर्भात योग्य नोंद ठेवून उपायुक्तांंनी त्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही यावेळी पाेलीस आयुक्तांनी केल्या.

कोविड-१९ च्या नियमांचे पालन न केल्यास योग्य ती कारवाई करताना जनतेशी संयमाने, सौजन्याने संवाद साधून परिस्थिती हाताळणे, कुणालाही कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन शिक्षा करू नये, पोलिसांची  प्रतिमा मलीन होईल असे कुठलेही कृत्य करू नये, असेही पाेलीस आयुक्त नगराळे यांनी यावेळी नमूद केले. 

सर्व कर्मचारी, अधिकारी यांनी लसीकरण करून घ्यावे. बंदोबस्तादरम्यान स्वतःचीही काळजी घ्यावी. कोरोनाबाधित पोलिसांना तत्काळ सर्व मदत मिळेल यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचनाही त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या. आयुक्तांनी या सर्व मार्गदर्शक सूचनांची ऑडिओ, व्हिडीओ क्लिपही व्हायरल केली.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरही लक्ष
रिक्षा, टॅक्सी, बससेवा सुरू राहणार आहेत. मात्र, रिक्षात दोन प्रवासी, टॅक्सीत ५० टक्के प्रवासी तसेच बसमध्ये उभ्याने प्रवास करता येणार नाही. त्यावरही पोलिसांचे लक्ष असणार आहे.

कर्तव्यात कमी पडणार नाही
मुंबई पोलीस दल सज्ज असून आमच्या कर्तव्यात कुठेही कमी पडणार नाही. आमच्याकड़ून जे शक्य होईल ते आम्ही जीवाची बाजी लावून शासनासाठी समर्थपणे करण्यास तयार आहाेत. अनैतिक कृत्य करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाईल. गर्दीच्या ठिकाणी गस्त घालणाऱ्या गाड्या व बिटमार्शल कार्यरत आहेत. तसेच सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्यांवर सायबर सेलचे बारकाईने लक्ष आहे.
- हेमंत नगराळे, पोलीस आयुक्त, मुंबई

Web Title: Be polite to the public while taking action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.