Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 11:52 IST2025-11-05T11:50:17+5:302025-11-05T11:52:05+5:30
Mumbai Banaganga Maha Aarti Today: मुंबईतील वाळकेश्वर येथील बाणगंगा तलावाच्या काठावर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आज संध्याकाळी महाआरती होणार आहे.

Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!
दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असणाऱ्या वाळकेश्वर येथील बाणगंगा तलावाच्या काठावर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आज, बुधवारी (०५ नोव्हेंबर २०२५) सायंकाळी महाआरती होणार आहे. जीएसबी मंदिर विश्वस्तांतर्फे मागील १२ वर्षांपासून आयोजित केल्या जाणाऱ्या या नेत्रदीपक सोहळ्याला यंदा नाशिकच्या सुप्रसिद्ध श्री काळाराम मंदिराचे महंत सुधीरदास महाराज यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
पूर्व-नोंदणीशिवाय प्रवेश नाही
गेल्या वर्षी मिळालेल्या अभुतपूर्व प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर गौड सारस्वत ब्राम्हण टेंपल ट्रस्टने (जीएसबी) यंदा विशेष सुरक्षा उपाययोजना केल्या आहेत. अपेक्षित गर्दी पाहता, यंदा केवळ पूर्व-नोंदणी केलेल्या भाविकांनाच तलावाच्या ठिकाणी प्रवेश दिला जाईल. बाणगंगा तलावाकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर तपासणी नाके उभारले जातील, जेथे नोंदणीकृत भाविकांनाच क्यूआर कोड स्कॅन करून प्रवेश मिळेल. ज्या भाविकांनी नोंदणी केलेली नाही, त्यांनी कृपया गर्दी करू नये आणि उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे ट्रस्टने स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या सूचना
दक्षिण मुंबईतील वाहतूक नियंत्रणाच्या अडचणींमुळे सुरुवातीला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. परंतु, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्तक्षेपानंतर ही परवानगी मिळाली. दरम्यान, भाविकांनी खासगी वाहने न आणता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचे आणि ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना शक्यतो महाआरतीला आणणे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले. शिवाय, भाविकांसाठी ग्रँट रोड (पश्चिम) आणि चर्नी रोड (पूर्व) पंडित पलुस्कर चौक येथून ट्रस्टतर्फे मोफत वातानुकुलित बस सेवा उपलब्ध करण्यात आली आहे, अशीही माहिती ट्रस्टकडून देण्यात आली.
सोहळ्याची वेळ व उपस्थिती
वर्षातून एकदाच होणाऱ्या या महाआरती सोहळ्याचे आयोजन बुधवारी सायंकाळी सहा वाजता करण्यात आले आहे. यावेळी हजारो दिवे लावले जाणार आहेत. महंत सुधीरदास महाराज यांच्यासह उद्योगपती, शासकीय अधिकारी आणि राजकीय नेते देखील उपस्थित राहणार आहेत.
महाआरतीचे थेट प्रक्षेपण
जे भाविक प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नाहीत, त्यांच्यासाठी महाआरतीचे थेट प्रक्षेपण उपलब्ध असणार आहे. हे प्रक्षेपण 'बाणगंगा महाआरती' या त्यांच्या यु ट्यूब वाहिनीवर पाहता येईल, अशी माहिती संयोजकांनी दिली आहे. हे आयोजन भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी करण्यात आले आहे, त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे.