“२०१७ लाच राष्ट्रवादीशी युतीची बोलणी झाली, मंत्रीही ठरले पण...”; भाजप नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 20:31 IST2022-04-27T20:30:25+5:302022-04-27T20:31:56+5:30
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या शपथविधीच्या दोन वर्षे आधीच राष्ट्रवादीसोबत युतीची अंतिम बोलणी झाली होती, असा मोठा खुलासा भाजप नेत्याने केला आहे.

“२०१७ लाच राष्ट्रवादीशी युतीची बोलणी झाली, मंत्रीही ठरले पण...”; भाजप नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई: महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे सरकारवर टीका करण्याची एकही संधी भाजप सोडत नसून, महाविकास आघाडीतील नेतेही भाजपवर निशाणा साधत आहेत. यातच आता भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी एक मोठा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. सन २०१७ मध्येच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीची चर्चा झाली होती. मंत्रीपदेही ठरली होती. मात्र, राष्ट्रवादीने युती करण्यास नकार दिला, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीच्या दोन वर्षेपूर्वीच अर्थात २०१७मध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत युतीसंदर्भात अंतिम बोलणी झाली होती. भाजपाला २०१७ मध्येच राष्ट्रवादीसोबत युती करावी असे वाटू लागले होते. शिवसेनेचे रोज खिशात राजीनामे आणि तोंडात जहर अशी त्रास देण्याची भूमिका असताना राज्यात राष्ट्रवादी आणि भाजप असे सरकार करावे, अशी चर्चा झाली. पालकमंत्री देखील ठरले. त्यानंतर पुन्हा भाजपाच्या शीर्षस्थ नेतृत्वाने ठरवले की आपण तीन पक्षांचे सरकार करू, असा घटनाक्रमच आशिष शेलार यांनी सांगितला.
राष्ट्रवादी काँग्रेसने युती करायला नकार दिला
मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने युती करायला नकार दिला. आम्ही तेव्हा म्हटले की, तीन पक्षांचे अर्थात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी असे सरकार करू. पण तेव्हा राष्ट्रवादीने याला नकार दिला. आमचे शिवसेनेशी जमूच शकत नाही. राष्ट्रवादी भाजपसोबत येत असताना भाजपने शिवसेनेला सोडायला नकार दिला. पण २०१९ला सत्ता दिसल्यावर मात्र शिवसेनेने भाजपला सोडायची भूमिका सहज घेतली, असे आशिष शेलार यांनी सांगितले. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी घेतलेल्या मुलाखतीत आशिष शेलार बोलत होते.
दरम्यान, राष्ट्रवादीने ज्या शिवसेनेसोबत जमूच शकत नाही असे तेव्हा म्हटले होते, त्यांनी आता शिवसेनेशी अशी सलगी केली की, जत्रेतले दोन भाऊ हरवले होते असे वाटावे. शिवसेना आणि राष्ट्रवादीची भूमिका किती महिन्यात किती वर्षात बदलते याची साक्षीदार भाजप आहे, असे सांगत आशिष शेलार यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडले.