बेस्ट चालकाशी वाद; रिक्षाचालकाने त्याच्या पायावर घातली रिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 10:44 IST2025-10-10T10:44:29+5:302025-10-10T10:44:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बेस्ट बस चालकासोबत झालेल्या वादातून संतप्त रिक्षाचालकाने थेट त्याच्या पायावर रिक्षा घालून पळ काढल्याची ...

बेस्ट चालकाशी वाद; रिक्षाचालकाने त्याच्या पायावर घातली रिक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बेस्ट बस चालकासोबत झालेल्या वादातून संतप्त रिक्षाचालकाने थेट त्याच्या पायावर रिक्षा घालून पळ काढल्याची धक्कादायक घटना खेरवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी बसचालक अहमद मिर्झा (वय ३८, रा. चेंबूर) यांनी ८ ऑक्टोबरला अनोळखी रिक्षाचालकाविरोधात तक्रार दिल्यावर गुन्हा नोंदवण्यात आला.
बेस्टमध्ये चालक असलेले मिर्झा हे ८ ऑक्टोबरला पहाटे पाच वाजता ड्युटीवर हजर झाले होते. प्रतीक्षानगर ते जुहू या २५५ क्रमांकाच्या बस मार्गावर ते कार्यरत असताना साईप्रसाद हॉटेलजवळ एका रिक्षाचालकाने त्यांच्या बसजवळून रिक्षा वळवली. त्यामुळे बसला पुढे जाण्यास जागा उरली नाही.
भांडण, शिवीगाळ
बस थांबवून खाली उतरल्यानंतर मिर्झा यांच्याशी रिक्षाचालकाने वाद घातला. त्यावेळी मिर्झा यांनी रिक्षाचालकाला शांत करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, उलट रिक्षाचालक भांडण करत शिवीगाळ करू लागला. मिर्झा यांनी तातडीने पोलिस नियंत्रण कक्षास फोन केला. ते पाहून रिक्षाचालक गाडी मागे घेऊन पळण्याचा प्रयत्न करू लागला.
मिर्झा यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, त्याने भरधाव रिक्षा त्यांच्या उजव्या पायावरून घालून तेथून पळ काढला. याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, फरार रिक्षाचालकाचा शोध सुरू आहे.