Eknath Shinde: शिवसेनेला दुसरा धक्का, विधिमंडळाकडून गटनेतेपदी एकनाथ शिंदेंच्या निवडीला मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 23:14 IST2022-07-03T23:12:49+5:302022-07-03T23:14:21+5:30
शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांना विधिमंडळ सचिवालयाने मोठा धक्का दिला आहे.

Eknath Shinde: शिवसेनेला दुसरा धक्का, विधिमंडळाकडून गटनेतेपदी एकनाथ शिंदेंच्या निवडीला मान्यता
मुंबई - शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत शिवसेनेच्या बहुतांशी आमदार घेत थेट उद्धव ठाकरेंना आव्हान दिले आहे. शिंदे यांच्यावर कारवाई करताना ठाकरेंनी त्यांच्याकडून विधान सभेतील गटनेते पद काढून घेत त्यांच्या जागी अजय चौधरींची नेमणूक केली. त्यावर, ही नेमणूक बेकायदा असल्याचा दावा शिंदे यांनी केला होता. यावर आज विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी चौधरींच्या गटनेतेपदी नेमणुकीला मान्यता दिल्याने हा वाद न्यायालयात गेला आहे. मात्र, आता एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदी मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे, शिवसेनेसाठी हा दिवसभरातील दुसरा मोठा धक्का आहे.
शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांना विधिमंडळ सचिवालयाने मोठा धक्का दिला आहे. अजय चौधरी यांची गटनेते म्हणून मान्यता रद्द करण्यात आली असून गटनेते म्हणून एकनाथ शिंदे हेच कायम राहतील, असे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ सचिवालयाने पाठवले आहे. त्यामुळे, विधानसभेत आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक हरल्यानंतर शिवसेनेला हा आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे.
मुंबई - शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदेंच्या नावाला मान्यता pic.twitter.com/yGH9PxWApx
— Lokmat (@lokmat) July 3, 2022
दरम्यान, कायद्यानुसार पक्षप्रमुखाने गटनेता नेमायचा असतो. गटनेत्याने प्रतोदांची नेमणूक करायची असते. उद्धव ठाकरेंनी अजय चौधरींची नेमणूक गटनेतेपदी केली आहे, ते पत्र मी स्वीकारले असल्याचे यापूर्वी विधानसभा उपाध्यक्ष नरहळी झिरवाळ यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर, शिंदे गटाकडूनही झिरवाळ यांना पत्र पाठविण्यात आले होते. सध्या हा वाद सर्वोच्च न्यायालयात असून याबाबत 11 जुलै रोजी सुनावणी होणार असल्याने सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तत्पूर्वीच, विधानसभा अध्यक्षांची निवड होताच, आज शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंच्या नावाला मान्यता देण्यात आली आहे.
दरम्यान, आम्हाला हा निर्णय मान्य नसून या निर्णयाविरुद्ध आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचे अजय चौधरी यांनी म्हटले आहे. तर, विधानसभेत आज शिवसेना नेते राजन साळवी यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे.