Join us  

Anil Deshmukh: सीबीआयचा होतोय गैरवापर; महाविकास आघाडीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 12:24 AM

मुंबई : अनिल देशमुख यांच्याकडे सीबीआयचे छापे टाकणे, त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करणे हा सीबीआयचा गैरवापर असल्याचा आरोप महाविकास आघाडीने ...

मुंबई : अनिल देशमुख यांच्याकडे सीबीआयचे छापे टाकणे, त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करणे हा सीबीआयचा गैरवापर असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. तर यांच्या भ्रष्ट नेत्यांच्या गळ्याशी आलं की यांना लगेच राजकारण दिसते, असा हल्लाबोल भाजपने केला आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, विरोधकांना राजकीयदृष्ट्या नामोहरम करण्यासाठी सीबीआयचा गैरवापर सुरू आहे. आमच्या सरकारच्या बदनामीचा हा डाव आहे. जे अधिकारी सरकारच्या विरोधात होते त्यांच्यावर विश्वास ठेवून चौकशी केली जात आहे. भाजपच्या नेत्यांवर अनेक गंभीर आरोप असताना त्यांची सीबीआय चौकशी केली  जात नाही.

सीबीआयने प्राथमिक चौकशी सांगितली असताना  अनिल देशमुखांवर छापे टाकणे, गुन्हे दाखल करणे हे सगळे संशयास्पद असल्याचे जनतेलाही कळते. त्यांचे राजकीय चारित्र्यहनन चालले  आहे. आमचे सरकार अडचणीत आणण्याचे प्रयत्न कोणी करत असतील तर त्याला आम्ही भीक घालणार  नाही. सीबीआयचे अधिकारी  काही कागदपत्रे बाहेरून आणून देशमुखांच्या बंगल्यात गेले हे संशयास्पद आहे.

गृहमंत्री, डीजींशी मुख्यमंत्र्यांची चर्चा

अनिल देशमुख यांच्यावरील सीबीआयच्या छाप्यांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याशी वर्षा निवासस्थानी चर्चा केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. सीबीआयच्या कारवाईसंदर्भात राज्याच्या महाधिवक्त्यांचे मत मागविण्यात येणार आहे.

जयंत पाटील यांचे आरोप बेछूट आहेत. अनिल देशमुखांचे प्रकरण आघाडी सरकारच्या गळ्याशी आले असल्याने आता ते सीबीआयवर टीका करत सुटले आहेत. सीबीआयने चौकशी ही उच्च न्यायालयाच्या आदेशाने सुरू केली. छापे टाकण्याचा, गुन्हे दाखल करण्याचा सीबीआयला अधिकार आहे. आघाडी सरकारमधील काही जण सुपात तर काही जात्यात आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरील आरोपांचीही चौकशी झाली पाहिजे. - चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष

जयश्री पाटील यांची मागणी : अनिल देशमुख यांच्याविरोधात उच्च  न्यायालयात याचिका दाखल केलेल्या अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी देशमुख यांच्या अटकेची मागणी केली आहे. देशमुख बाहेर राहिले तर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करतील, असे त्या म्हणाल्या.

उच्च न्यायालयाने फक्त प्राथमिक चौकशीचे आदेश देत अहवाल सादर करा, असे सीबीआयला सांगितले होते. अनिल देशमुखांवर धाडी, एफआयआर वगैरे हा अतिरेक आहे. हा सर्व प्रकार न्याय व तर्कसंगत दिसत नाही. दया...कुछ तो गडबड है.- खा. संजय राऊत, शिवसेनेचे नेते, प्रवक्ते.

न्यायालयावर अविश्वास न दाखवता संजय राऊत यांनी कायदा आणि तपास यंत्रणेवर विश्वास ठेवावा,  उच्च न्यायालयाचे चौकशीबाबतचे आदेश स्पष्ट आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी न्यायालयाचे आदेश स्वत:च्या सोयीने वाचले असल्याने त्यांच्याकडून अशी वक्तव्ये केली जात आहेत. -प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

मूळ मुद्द्यावरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न - पटोले

देशमुख यांच्यावर होत असलेली कारवाई म्हणजे मूळ मुद्द्यावरून लक्ष हटवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, आता कोरोनाविरोधात लढायला हवे. पण तेथील चुका लक्षात येऊ नयेत, यासाठी जाणीवपूर्वक ही कारवाई केली जात आहे.

 या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चौकशी सुरू आहे. त्यांच्याशी बोलणं झालेले नाही. सीबीआयसारख्या संस्थांनी निःपक्षपाती चौकशी करावी, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

टॅग्स :अनिल देशमुखमहाराष्ट्र सरकारगुन्हा अन्वेषण विभागभाजपाराष्ट्रवादी काँग्रेस