पालिका निकालांनंतर अमित ठाकरेंची पोस्ट, म्हणाले, "मराठीला आणि मराठी माणसाला कधीही एकटं..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 11:25 IST2026-01-17T11:13:54+5:302026-01-17T11:25:20+5:30

BMC Election Result MNS Amit Thackeray: संपूर्ण देशभरातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगपालिकेच्या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेनेच्या महायुतीनं मोठी बाजी मारली.

Amit Thackeray x post after the bmc election 2026 results said we will never let marathi manus alone fight for them | पालिका निकालांनंतर अमित ठाकरेंची पोस्ट, म्हणाले, "मराठीला आणि मराठी माणसाला कधीही एकटं..."

पालिका निकालांनंतर अमित ठाकरेंची पोस्ट, म्हणाले, "मराठीला आणि मराठी माणसाला कधीही एकटं..."

BMC Election Result MNS Amit Thackeray: संपूर्ण देशभरातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगपालिकेच्या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेनेच्या महायुतीनं मोठी बाजी मारली. तर कडवी झुंज देणाऱ्या ठाकरे बंधूंच्या युतीला पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीत उद्धवसेनेनं ६५ जागांवर विजय मिळवला. मात्र राज ठाकरे यांच्या मनसेला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. निवडणुकीच्या निकालांनंतर मनसेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी एक पोस्ट शेअर करत मराठी माणसासाठी आपला लढा सुरुच राहणार असल्याचं म्हटलं.

काय म्हणाले अमित ठाकरे?

"निकाल काहीही असो, पण एकाच गोष्टीची खंत वाटते, माझ्या मराठी माणसाला जे अपेक्षित होतंस ते देण्यासाठी मला कदाचित अजून मेहनत घ्यावी लागेल. पण एक लक्षात ठेवा, माझं आणि तुमचं नातं फक्त एका बटनापुरतं किंवा मतापुरतं कधीच नव्हतं. राजकारणात जय-पराजय होतच असतो. पण माणसांची मनं जिंकणं माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे," असं अमित ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलंय.

"तुम्ही आम्हाला जे प्रेम आणि साथ दिली, ती कोणत्याही सत्तेपेक्षा मोठी आहे. माझा शब्द आहे तुम्हाला... सत्ता असो किंवा नसो, तुमच्या हक्कासाठी महाराष्ट्र सैनिक नेहमी धावून येतील. महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी आमचा लढा यापुढेही सुरूच राहिल. खचून जाऊ नका... मराठीला आणि मराठी माणसाला कधीच एकटं पडू देणार नाही, हा शब्द आहे ठाकरेंचा," असंही ते पुढे म्हणाले.

निकालांनंतर राज ठाकरे काय म्हणाले?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळालं नाही याचं दुःख आहे, पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाही. आपले जे नगसेवक निवडून आलेत ते तिथल्या तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. तसेच मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की आहे, असा विश्वासही राज ठाकरे यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले की, आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची , मराठी अस्मितेच्यासाठीची आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची लढाई आहे. ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे. अशा लढाया या दीर्घकालीन असतात याचं भान तुम्हा सगळ्यांना आहे, अशा शब्दात राज ठाकरे यांनी निवडणूक झाली तरी मराठीची लढाई सुरू राहील, असं सूचक विधान केलं.

Web Title: Amit Thackeray x post after the bmc election 2026 results said we will never let marathi manus alone fight for them