अमरावतीतील हत्या प्रकरणाची थेट अमित शहांनी घेतली दखल, तपास NIA कडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 15:18 IST2022-07-02T15:17:02+5:302022-07-02T15:18:12+5:30
येथील उमेश कोल्हे यांची २१ जून रोजी रात्री गळ्यावर वार करून हत्या करण्यात आली होती.

अमरावतीतील हत्या प्रकरणाची थेट अमित शहांनी घेतली दखल, तपास NIA कडे
मुंबई /अमरावती : गेल्या २१ जून रोजी गळा कापून झालेल्या व्हेटर्नरी मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणातील ‘फॅक्ट’ शोधण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्था असलेल्या एनआयएची चार ते पाच सदस्यीय चमू अमरावतीत दाखल झाल्याची माहिती आहे. त्यांनी शुक्रवारी शहर कोतवाली पोलीस ठाणे गाठून संबंधितांकडून त्या घटनेची संपूर्ण माहिती घेतली तथा अटक आरोपींचीही झाडाझडती घेतल्याचे सांगण्यात आले. मात्र, पोलिसांनी त्याला अधिकृत दुजोरा दिला नाही. आता, थेट गृहमंत्री अमित शहा यांनीच ट्विट करुन या घटनेची दखल घेतल्याचे सांगितले आहे.
‘उदयपूरच का? महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये उदयपूरसारखी घटना घडून एका फार्मासिस्टची निर्घृण हत्या करण्यात आली,’ असे ट्विट आमदार नीतेश राणे यांनी केल्याने येथील उमेश कोल्हे हत्याप्रकरण नव्याने चर्चेत आले. येथील उमेश कोल्हे यांची २१ जून रोजी रात्री गळ्यावर वार करून हत्या करण्यात आली होती. ही हत्या नूपुर शर्मा वादाशी संबंधित आहे का, याचा काटेकोर तपास करावा, अशी मागणी भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केली होती. त्या अनुषंगाने शहर पोलिसांनी तपासही केला. मात्र, कोल्हे यांच्या हत्येचा नूपुर शर्मा प्रकरणाशी संबंध नसल्याचा निर्वाळा अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी दिला. त्यानंतर, आता महाराष्ट्र सरकारने हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे दिला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून अमरावतीतील कोल्हे खून प्रकरणाचा तपास NIA कडे सोपविण्यात आल्याचे सांगितले. या हत्याप्रकरणाचे कट-कारस्थान, हत्येच्या मागे असेलेल्या संघटना आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचा तपास करण्यात येईल, असेही अमित शहा यांनी गृहमंत्रालयाच्या ट्विट अकाऊंटवरुन सांगितले आहे.
गृह मंत्रालय ने 21 जून को अमरावती महाराष्ट्र में उमेश कोल्हे की बर्बर हत्या से संबंधित मामले की जांच NIA को सौंप दी है।
— ANI_HindiNews (@AHindinews) July 2, 2022
हत्या के पीछे की साजिश, संगठनों की संलिप्तता और अंतरराष्ट्रीय संबंधों की गहन जांच की जाएगी। pic.twitter.com/fMHtxuxan3
दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अटकेपासून दूर असलेला सहावा आरोपीच या संपूर्ण घटनाक्रमाचा सूत्रधार आहे. त्यानेच आपल्याला कामे वाटून दिल्याची कबुली अन्य आरोपींनी दिली. शुक्रवारी एनआयएच्या नागपूरस्थित कार्यालयाची एका वरिष्ठ अधिकाऱ्यांचा चमू पोहोचली. दरम्यान, या घटनेचा तपास एनआयएकडे सोपविला गेलेला नाही. मात्र, ती केवळ फॅक्ट फाइंडिंगसाठी आल्याचे एका अधिकाऱ्याने नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर सांगितले.