Join us
Daily Top 2Weekly Top 5

“अमित शाहांचे निवृत्तीचे विचार देशासाठी शुभसंकेत, RSS मोदींना तेच सांगतोय”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 15:58 IST

Sanjay Raut News: देशाला दिलेली अनेक वचने पंतप्रधान मोदी विसरले आहेत. पण तुम्हाला निवृत्त व्हायचे आहे हे देश तुम्हाला विसरू देणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut News: एकीकडे महाराष्ट्रात आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारणाला वेग आला असताना दुसरीकडे बिहार विधानसभा निवडणुकीवरून देश पातळीवरील राजकारण तापताना पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या एका विधानावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खोचक टोला लगावला आहे. संजय राऊत पत्रकारांशी बोलत होते. 

एका कार्यक्रमात बोलताना अमित शाह यांनी निवृत्तीबाबत मोठे विधान केले. मी निवृत्त झाल्यावर आयुष्यभर नैसर्गिक शेती करण्याचे ठरवले आहे. तसेच, निवृत्तीनंतर मी माझे आयुष्य वेद, उपनिषद वाचण्यात वेळ घालवीन. नैसर्गिक शेती, हा एक प्रकारचा वैज्ञानिक प्रयोग आहे, जो अनेक प्रकारचे फायदे देतो, असे अमित शाह यांनी म्हटले आहे. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असून, यावर संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. 

अमित शाहांचे निवृत्तीचे विचार देशासाठी शुभसंकेत

अमित शाह यांच्या मनात निवृत्तीचे विचार येत असतील तर देशासाठी हे शुभसंकेत आहेत. ७५ वर्षे हे भाजपातील निवृत्तीचे वय आहे. नरेंद्र मोदींनी लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, जसवंत सिंग यांना निवृत्ती स्वतःच्या स्वार्थासाठी लादली. आता सप्टेंबर महिन्यात नरेंद्र मोदी ७५ वर्षांचे होत आहेत. जगभ्रमण करून झाले आहे. सगळी सुखे भोगून झाली आहेत. आता जो नियम तुम्हीच केला आहे ७५ वर्षे वयाचा. मला वाटते की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांना सूचित करत आहे की, तुम्हाला निवृत्त व्हावे लागेल. त्यांना देश सुरक्षित हातांमध्ये सोपवावा लागेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ७५ वर्षे निवृत्तीचा नियम आहे तो सगळ्यांसाठी समान आहे. लालकृष्ण आडवाणी असोत, नरेंद्र मोदी असोत किंवा अमित शाह असोत, त्यांना आता निवृत्त व्हावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी वचने देतात ती विसरतात. १५ लाख प्रत्येकाच्या खात्यात जमा करण्याचे वचन, गरिबी हटवण्याचे वचन, पाकिस्तानला धडा शिकवण्याचे वचन, या सगळ्या गोष्टी पंतप्रधान मोदी विसरले आहेत. मात्र तुम्हाला निवृत्त व्हायचे आहे, हे देश पंतप्रधान मोदींना विसरू देणार नाही तसेच सरसंघचालक मोहन भागवत हेदेखील विसरू देणार नाहीत, असा टोला संजय राऊतांनी लगावला.

दरम्यान, जेव्हा पंचाहात्तरीची शाल अंगावर पडते त्याचा अर्थ आता थांबावे, तुमचे वय झाले आहे; बाजूला सरा, आम्हाला काम करू द्या, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात सांगितले. या गोष्टीचा संबंध आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीशी जोडला जात आहे. यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे म्हटले जात आहे. 

 

 

टॅग्स :संजय राऊतअमित शाहनरेंद्र मोदीमोहन भागवतराष्ट्रीय स्वयंसेवक संघभाजपा