अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 10:48 IST2025-08-25T10:42:42+5:302025-08-25T10:48:33+5:30
संघटनात्मक जबाबदाऱ्या अमित साटम समर्थपणे पार पाडतील. साटम यांच्या नेतृत्वात मुंबईत भाजपा नवीन रेकॉर्ड तयार करेल असा मुख्यमंत्र्यांनी दावा केला.

अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
मुंबई - आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपा अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत साटम यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. यावेळी महापालिकेत भाजपा रेकॉर्ड करणार असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
साटम यांच्या निवडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अमित साटम आमदार आहेत, ३-४ वेळा नगरसेवक म्हणून काम केले आहे. विधानसभेत अभ्यासू आणि आक्रमक आमदार म्हणून त्यांची प्रतिमा आहे. मुंबईतल्या प्रश्नांची जाण आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी जी कल्पकता हवी ती त्यांच्यात आहेत. निश्चितपणे अमित साटम यांच्या नेतृत्वात भाजपा मुंबईत विजयाची घौडदौड राखेल. मुंबई महापालिकेत महायुतीची सत्ता येईल असा विश्वास आहे. संघटनात्मक जबाबदाऱ्या अमित साटम समर्थपणे पार पाडतील. साटम यांच्या नेतृत्वात मुंबईत भाजपा नवीन रेकॉर्ड तयार करेल असा त्यांनी दावा केला.
तसेच प्रदीर्घ काळ आशिष शेलार यांनी मुंबई विभागाचे अध्यक्षपद अतिशय समर्थपणे सांभाळले. २०१७ निवडणुका, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका यात त्यांनी उत्तम काम केले. मंगलप्रभात लोढा यांनीही मुंबईचा कार्यभार मधल्या काळात सांभाळला. शेलार यांच्या नेतृत्वात मुंबईत भाजपाला विधानसभेत चांगले यश मिळाले. भाजपा मुंबईतला नंबर एकचा पक्ष म्हणून पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले. आता नवीन संघटनात्मक रचनेत आशिष शेलार यांच्याकडे मंत्रिपदाचा भार आलेला आहे. त्यात भाजपाने नवीन मुंबई अध्यक्ष निवडला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष यांनी कोअर कमिटी, वरिष्ठांशी चर्चा करून हा निर्णय घेतला असं सांगत मुख्यमंत्र्यांनी शेलार आणि लोढा यांच्या कामाचे कौतुक केले.
दरम्यान, राहुल गांधी सातत्याने खोटे बोलतात. राहुल गांधी सत्य बोलतायेत असं महाराष्ट्रातील काही नेत्यांना स्वप्न पडले आहे. मात्र खोट्याला काही आधार नसतो. जनतेत जाऊन जनतेचा विश्वास जिंकावा लागतो हे जोपर्यंत या नेत्यांना कळणार नाही तोपर्यंत हे खोटे बोलत राहतील असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतचोरीच्या आरोपांवरून विरोधकांना लगावला.