मुंबई - आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा-मनसे आणि उद्धवसेनेत आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मुंबईचा महापौर खान बसवायचा आहे हे ठाकरेंचे षडयंत्र आहे असा आरोप भाजपाने केला. त्यावर खासदार संजय राऊत यांच्यासह मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी निशाणा साधला.
खासदार संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आणि मुंबईचे अध्यक्ष साटम बरेच काही बोलले. खान महापौरपदी बसतील असं बोलले, अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती कुणी केले? आरिफ मोहम्मद खान यांना बिहारचे राज्यपाल कुणी केले, यासारखी अनेक उदाहरणे मला देता येतील. या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात भाजपा नव्हता. हमीद दलवाई, युसूफ मेहर अली, अरूणा असफ अली, सिकंदर बक्स यांचा अभ्यास करावा. अभ्यास कच्चा असल्याने त्यांना इतिहास माहिती नाही. ज्यांना खानांचा एवढा धिक्कार असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी हसन मुश्रीफांना मंत्रिमंडळातून दूर करावे. मुंबईचा महापौर मराठी असेल आणि तो शिवसेनेचा होईल असं त्यांनी सांगितले.
तर मराठी आमच्या रक्तात आणि श्वासात आहे. त्यामुळे मुंबईचा महापौर मराठीच बसेल. या लोकांना गुजराती महापौर बसवून मुंबई गुजरातला आंदण द्यायची आहे का? मुंबईचा पालकमंत्री गुजराती माणसाला का केले होते, मुंबई तुम्हाला गुजरातच्या घशात घालायची आहे हे लोकांना कळते. जोपर्यंत मनसे आहे तोपर्यंत मुंबईचा महापौर मराठीच होणार आहे. रझा अकादमीनं जो मुंबईत मोर्चा काढला, जो धुडगूस घातला त्याला उत्तर देण्यासाठी फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर होती. भाजपाचे लोक घरात शेपट्या घालून बसले होते. त्यामुळे हिंदुत्व काय, मराठी माणूस काय हे भाजपाकडून आम्हाला शिकण्याची गरज नाही असा टोला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी लगावला.
दरम्यान, आम्ही हिंदू आहोत, हे आम्हाला सिद्ध करायची गरज नाही. आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही. आम्ही गुजराती नाही. त्यामुळे ना गुजराती, ना भैय्या इथला महापौर मराठीच असेल. मराठी माणूसच मुंबईचा महापौर बसवेल. भाजपा ज्या गोष्टी करतंय तो बोगस वल्गना आहे. फक्त नॅरेटिव्ह तयार करण्यासाठी केले जात आहे. राज ठाकरे, मनसे असेपर्यंत तोपर्यंत मुंबईचा महापौर मराठीच असणार असं देशपांडे यांनी म्हटलं.
भाजपानं काय केला आरोप?
मुंबईत षडयंत्र रचलं जात आहे. जे राजकारण उबाठावाले मतांच्या लांगुनचालन करतायेत. मुंबईच्या प्रत्येक वार्डात हारून खान निवडून येईल, कदाचित उद्या मुंबईचा महापौर कुणी तरी खान होईल. त्यामुळे मुंबईकर आपल्याकडे आशेने बघतोय. मुंबई महाराष्ट्राच्या भोवती घोंगावणाऱ्या हिरव्या वादळाला परतवण्याची क्षमता कुणात असेल तर फक्त भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे असं सागत भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी ठाकरे बंधू यांच्यावर टीका केली.