"मुलगा निर्दोषच होता, आम्ही भीक मागून..."; अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटर प्रकरणावर आईची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 15:12 IST2025-01-20T15:00:48+5:302025-01-20T15:12:51+5:30

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात मुंबई हायकोर्टाने दिलेल्या निर्णयावर त्याच्या आईने प्रतिक्रिया दिली.

Akshay Shinde mother reacts to Mumbai High Court decision in Badlapur encounter case | "मुलगा निर्दोषच होता, आम्ही भीक मागून..."; अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटर प्रकरणावर आईची प्रतिक्रिया

"मुलगा निर्दोषच होता, आम्ही भीक मागून..."; अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटर प्रकरणावर आईची प्रतिक्रिया

Badlapur Akshay Shinde Encounter:  बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात एन्काऊंटर करण्यात आला होता. बदलापुरात तीन शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांशी झालेल्या चकमकीत अक्षय शिंदे मारला गेला होता. मात्र आता न्यायालयीन चौकशी समितीच्या अहवालातून अक्षय शिंदेंच्या मृत्यूसाठी पाच पोलीस जबाबदार असल्याचे अहवालात म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. यावर अक्षय शिंदेंच्या आईने प्रतिक्रिया दिली आहे.

बदलापूर येथील शाळेतील लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या पोलीस एन्काऊंटर प्रकरणी मुंबई हायकोर्टात अहवाल सादर करण्यात आला. न्यायालयीन चौकशी समितीचा अहवालातून या प्रकरणी खळबळजनक माहिती समोर आली आहे. अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरला सर्वस्वी पोलीसच जबाबदार असल्याचेही अहवालातून पुढे आले आहे. यानंतर एबीपी माझासोबत बोलताना अक्षय शिंदेच्या आईने प्रतिक्रिया दिली. अक्षय शिंदे हा निर्दोष होता असं त्याच्या आईने म्हटलं आहे. माझ्या मुलाने गुन्हा केला नव्हता, असंही त्याच्या आईने म्हटलं आहे.

"माझा मुलगा निर्दोषच होता. त्याने गुन्हा केलाच नव्हता. ज्यांनी गुन्हा केलाय त्यांना शिक्षा भेटायला हवी. माझ्या मुलाची बाजू सत्याची होती. त्याच्यावर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर त्याला मारून टाकण्यात आलं. कोर्टाच्या निर्णयावरुन मला खूप आनंद झाला आहे. माझ्या मुलाने गुन्हा केलाच नव्हता. त्यांनी माझ्या मुलाला जी शिक्षा दिली त्यांनाही कोर्टाने तिच शिक्षा द्यायला हवी," असं अक्षय शिंदेच्या आईने सांगितले.

या घटनेनंतर आम्हाला काम मिळत नाहीये. आम्ही कल्याणमध्येच आहोत. अजूनही तसेच आहोत. आम्ही कोणतही काम नाहीये. भीक मागून खात आहे. या सगळ्या निर्णयाबद्दल मी समाधान व्यक्त करते, असेही अक्षय शिंदेच्या आईने म्हटलं.

कोर्टाने काय म्हटलं?

अक्षय शिंदे एन्काऊंटरचा न्यायालयीन चौकशी समितीचा अहवाल कोर्टात सादर करण्यात आला. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने  न्यायालयात अहवाल वाचून दाखवला. "अक्षय शिंदेसोबत झालेल्या झटापटीत पाच पोलिसांनी वापरलेला बळाचा वापर अनावश्यक होता आणि त्याच्या मृत्यूसाठी हे पाचही पोलीस जबाबदार आहेत. पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, अक्षय शिंदेंने त्यांच्यावर गोळीबार केला होता. मात्र मृताचे बंदुकीवर बोटांचे ठसे नाहीत. स्वसंरक्षणार्थ गोळीबार करणाऱ्या पोलिसांचा वैयक्तिक बचाव अवास्तव आणि संशयास्पद आहे," असं या अहवालात म्हटलं आहे.

Web Title: Akshay Shinde mother reacts to Mumbai High Court decision in Badlapur encounter case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.