Ajit Pawar: 'अजित पवारांचेच आमदार संध्याकाळी आमच्याकडे येऊन बसतात', शिंदे गटाचं असंही राजकारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2022 09:01 IST2022-10-17T08:59:34+5:302022-10-17T09:01:29+5:30
145 चा बहुमताचा आकडा आहे, तोपर्यंत सरकार टिकणार. मंत्रिपदावरुन शिंदे गटातल्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे.

Ajit Pawar: 'अजित पवारांचेच आमदार संध्याकाळी आमच्याकडे येऊन बसतात', शिंदे गटाचं असंही राजकारण
मुंबई - राज्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळाला. तत्पूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पहाटेची शपथ घेऊन राजकीय भूकंप घडवला होता. आता, मुख्यमंत्रीपदी विराजमान होत एकनाथ शिंदे यांनी राजकीय उलथापालथ घडवून आणली आहे. मात्र, हे सरकार लवकरच कोसळेल, असे भाकीत आता महाविकास आघाडीतील नेत्यांकडून केले जात आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार यांनीही तसे विधान केले होते. त्यावर, आता शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभुराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
145 चा बहुमताचा आकडा आहे, तोपर्यंत सरकार टिकणार. मंत्रिपदावरुन शिंदे गटातल्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळं काही काळ थांबा, सर्वच समोर येईल, असे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले होते. तसेच, योग्य वेळेची वाट पाहतोय, असंही त्यांनी म्हटलं होतं. त्यावर, आता शंभुराज देसाई यांनी प्रत्युत्तर देताना, अजित पवारांचे आमदार संध्याकाळी आमच्याकडे येत असतात, असे म्हटले. तसेच, कामे घेऊन आल्यावर आम्ही त्यांना पक्षप्रवेशाचंही विचारतो, असेही त्यांनी स्पष्टपणे म्हटले.
'जे आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत, त्यातील काही आमदार संध्याकाळी कामे घेऊन आमच्याकडे येत असतात आणि तेवढं जरा मुख्यमंत्र्यांकडे विषय घ्या, अशी विनंती करतात. मग आम्हीही त्यांना सांगतो की सगळी कामे करू, पण आमच्याकडे येण्याचं काय? हे सगळं थांबवण्यासाठी आता अजित पवार हे राज्य सरकार अस्थिर असल्याचा दावा करत आहेत,' असे शंभुराज देसाई यांनी सांगितले. दरम्यान, शिंदे गटाकडून सध्या पक्षात प्रवेश करुन घेण्यासाठी धडपड सुरू आहे. त्यातच, अजित पवारांच्या विधानावर पलटवार करताना त्यांनी राष्ट्रवादीचे आमदारही सोबत घेत असल्याचे सूचवले आहे.