Join us
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवार अन् जयंत पाटील दिल्लीत दाखल; राऊतांनीही घेतली शरद पवारांची भेट, हालचालींना वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2021 18:33 IST

शरद पवारांच्या या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली.

नवी दिल्ली/ मुंबई: सचिन वाझे प्रकरणानंतर (Sachin Vaze Case) मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून झालेल्या उचलबांगडीनंतर परमबीर सिंह (Parambeer Singh) यांनी शनिवारी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर विरोधकांकडून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार (Sharad Pawar) यांना अनिल देशमुख यांच्या भवितव्याबाबत विचारले असता त्यांनी याबाबत मोघम उत्तर देऊन वेळ मारून नेली.

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत विचारलेल्या पत्राला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर पत्राच्या माध्यमातून केलेले आरोप गंभीर आहेत. मात्र याबाबत अनिल देशमुख यांचीही बाजू जाणून घेतली पाहिजे. त्यांच्या राजीनाम्याबाबत आम्ही सर्वांशी बोलून निर्णय घेऊ. याबाबतचा निर्णय हा उद्यापर्यंत होऊ शकेल. असे असले तरी याबाबतचा अंतिम निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच घेतील, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. 

शरद पवारांच्या या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री जयंत पाटील देखील दिल्लीत आता दाखल झाले आहेत. अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात दिल्लीत शरद पवारांसोबत बैठक पार पडणार आहे. राष्ट्रवादीच्या या बैठकीत अनिल देशमुख यांच्याबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

परमबीर सिंह यांच्या दाव्यानंतर शरद पवार आणि अनिल देशमुख यांच्यात शनिवारी फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. गृहमंत्र्यांवर गंभीर आरोपांनंतर विरोधक काहीसे आक्रमक झाले आहेत. त्यामुळे अनिल देशमुख यांच्याबाबत काय भूमिका घ्यायची यावर शरद पवार चर्चा करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे देखील या बैठकीत उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 

मुंबई पोलिसांना १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट; शरद पवार हसले 

अनिल देशमुख यांनी मुंबईतील बार, नाइट क्लब आणि रेस्टॉरंट्सकडून महिन्याला १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. तुम्हीही राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. खरंच असं काही टार्गेट मुंबई पोलिसांना असतं का? असा प्रश्न एका पत्रकारानं शरद पवार यांना विचारला. त्यानतंर पवार हसले आणि म्हणाले "हे तुम्ही मला काय मुंबई पोलिसांच्या कोणत्याही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला किंवा माजी अधिकाऱ्याला विचारलं तर तेही हसतील, असं पवार म्हणाले. 

पत्राच्या टायमिंगकडे वेधलं लक्ष

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळून आलेल्या कारचा तपास सुरू आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातही चौकशी सुरू आहे. या घडामोडी सुरू असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीला गेले आणि त्यानंतर लगेच काही दिवसांत परमबीर सिंग यांचं पत्र समोर आले, असं म्हणत पवारांनी 'लेटर बॉम्ब'च्या टायमिंगकडे लक्ष वेधलं.

कुणाला तरी खुश करण्यासाठी पत्र- जयंत पाटील

कुणाला तरी खुश करण्यासाठी परमबीर सिंह यांनी हे पत्र लिहिलं असावं. मुकेश अंबानी यांच्या घराबाहे सापडलेल्या स्फोटकांप्रकरणातून सुटण्यासाठी परमबीर सिंह यांनी पत्राचा घाट घातल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच सचिन वाझे आणि शिवसेना यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्य सरकारने या प्रकरणाच्या खोलात जाऊन तपास घेण्याचा निर्णय घेतला होता.  त्यातूनच हे पत्र आल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं. 

महाराष्ट्राच्या राजकारणाचे गुन्हेगारीकरण झालेलं आहे- चंद्रकांत पाटील

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जे आरोप लगावले आहेत, ते अतिशय धक्कादायक आणि निंदनीय आहेत. आता हे स्पष्ट आहे की ठाकरे सरकार भ्रष्ट आहे. त्यामुळे केवळ अनिल देशमुखांनीच नव्हे तर संपूर्ण ठाकरे सरकारने सत्तेतून पाय उतार व्हावे. चंद्रकांत पाटील यांनी पुढे म्हटलं की, महाराष्ट्राच्या राजकारणाचे गुन्हेगारीकरण झालेलं आहे हे या ठाकरे सरकारने पदोपदी सिद्ध केले. अनिल देशमुख हे सचिन वाझेंना महिना 100 कोटी रुपयांची वसुली करायला सांगायचे. पोलिसांना वसूली करायला लावणारा गृहमंत्री महाराष्ट्र कदापी सहन करु शकत नाही.

टॅग्स :शरद पवारअनिल देशमुखअजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसमहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकारदिल्ली